शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या मशाल चिन्हाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेच्या रणरागिणी विजेता नार्वेकर, रती शटटे, किशोरी काजरोळकर, ऋतिका तुरळकर या मशाल चिन्ह मतदारसंघात सर्वत्र पोहोचावे यासाठी जोरदार मेहनत घेत आहेत.
शिवडीत महाविकास आघाडीचा आवाज
शिवडी मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अजय चौधरी यांच्या प्रचार रॅलीला आज दमदार प्रतिसाद मिळाला. सखाराम बाळाजी पवार मार्ग, करीरोड नाका ते ना. म. जोशी मार्ग डिलाईल रोडपर्यंतच्या परिसरांत जल्लोषात रॅली काढण्यात आली. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तरुणांची गर्दी आणि ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद हे दृश्य जागोजागी दिसून आले.
आता शरद पवार यांच्या बॅगेची तपासणी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे हॅलिकॉप्टर आणि बॅगेचीही तपासणी करण्यता आली. शरद पवार हे बारामतीहून सोलापूरला प्रचारासाठी जात होते, त्यावेळी निवडणूक आयोगाचे अधिकारी हॅलिपॅडवर पोहोचले आणि शरद पवार यांच्या बॅगेची तपासणी केली. या तपासणीचा व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. व्हिडिओत निवडणूक अधिकारी हॅलिकॉप्टरमधून शरद पवार यांची बॅग बाहेर काढताना आणि त्यात ठेवलेल्या वस्तूंची तपासणी करताना दिसत आहेत. तपासणीदरम्यान शरद पवार हे हॅलिकॉप्टरच्या बाहेर उभे राहून सर्व पहात होते. तपासणीनंतर ते सोलापुरातील सभेला रवाना झाले. शरद पवार यांच्या चेकिंगच्या एक दिवस आधी अमरावतीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बॅग तपासण्यात आली.
हिंगोलीत नोटांचे घबाड सापडले
आचारसंहितेच्या काळात नाकाबंदीदरम्यान विविध शहरांत मोठय़ा प्रमाणात पैशांचे घबाड सापडत आहे. हिंगोलीमध्ये एक कोटीहून अधिक रोकड जप्त करण्यात आले. हिंगोली पोलीस आणि निवडणूक विभागाच्या कर्मचाऱयांनी ही कारवाई केली. मतदानाच्या दोन दिवस आधी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रोकड मिळाल्याने हिंगोली परिसरात खळबळ उडाली. पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान एका ट्रव्हेलमधून ही सर्व रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम कुठून आली. ट्रव्हेलमधून ती कुठे नेण्यात येत होती याचा तपास पोलीस करत आहेत.