सगळ्यांचा नाद करायचा, पण माझा नाही! शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा

राष्ट्रवादी काँगेसचे सर्वेसर्वा शरद पवार टेंभुर्णी येथील सभेत पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ‘एकदा रस्ता चुकला की, त्याला जागा दाखवलीच पाहिजे. त्यांची जागा दाखवायची असेल, तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं. संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की, सगळ्यांचा नाद करायचा, पण माझा नाही,’ असा थेट इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टेंभुर्णी येथील सभेत अजित पवार गटाला दिला.

माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील, मोहोळ विधानसभेचे राजू खरे, पंढरपूर विधानसभेचे अनिल सावंत, माळशिरस विधानसभेचे उत्तम जानकर यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथील जाहीर सभेत शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, ‘महाराष्ट्राचे सरकार महिलाविरोधी आहे, तरुणांविरोधी आह़े, शेतकरीविरोधी आहे. तुम्हा-आम्हा सर्वांच्या हिताची जपणूक करण्याची दृष्टी या सरकारची नाही. हे सगळं बदलायचं असेल, तर सरकार बदललं पाहिजे. महागाईमुळे महिलांना घरचा प्रपंच चालवणं कठीण झालं आहे. दैनंदिन जीवनातील वस्तूंवर सरकारने प्रचंड कर लावले आहेत. या सगळ्या गोष्टींचा सामान्य माणसांना त्रास होतोय. यातून सामान्य माणसाची सुटका करायची असेल, तर उद्याच्या 20 तारखेला एकच काम करायचं आहे. ते काम करायचं असेल, तर 20 तारखेला सगळ्यांना एकच निकाल घ्यावा लागेल.’

‘महाविकास आघाडीने जाहीर केलेली पंचसूत्री प्रत्यक्षात राबवण्यासाठी तुमची मदत हवी आहे. अलीकडच्या काळामध्ये या तालुक्याबद्दल बाहेर अधिक चर्चा आहे. एकेकाळी हा तालुका दुष्काळी तालुका होता. मी स्वतः या ठिकाणी आमदार होतो, तेव्हा अनेकदा आलो होतो. त्या वेळेला मोरे नावाचे गृहस्थ आमदार होते. लाल टोपी घालायचे. आणि त्यानंतर रावसाहेब आमदार झाले. त्या सगळ्या काळामध्ये इथे आलो तर पहिली चर्चा व्हायची, दुष्काळासाठी काम द्या. त्याऐवजी काही मागणीच नसायची. लोकांनी त्या संकटाच्या काळामध्ये कष्ट केले, घाम गाळला आणि आपला प्रपंच चालवला. आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता आली. आम्ही सगळे प्रमुख लोक बसलो आणि पाण्याचं दुखणं सोडवल्याशिवाय माढा तालुका सुधारणार नाही, ही गोष्ट आम्ही लोकांनी स्वीकारली,’ असे पवार यांनी सांगितले. या सभेला महाविकास आघाडीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, संजय कोकाटे, उमेश पाटील, उमेश होळकर, नितीन कापसे, बहुजन रयत परिषदेच्या कोमल साळुंखे-ढोबळे, प्रेमलता रोंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.