मणिपूरातील भाजपच्या बिरेन सिंग सरकारला धक्का; NPP ने पाठिंबा काढला

मणिपूरातील हिंसाचार अद्याप सुरूच आहे. या हिंसाचारामुळे अनेकांचा बळी गेला आहे. येथील हिंसाचार रोखण्यात केंद्र आणि राज्य सरकारला यश आलेले नाही. पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. त्यातच आता भाजपला मणिपूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. मणिपूरमध्ये कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) बिरेन सिंग सरकारचा पाठइंबा काढून घेतला आहे. त्यामुळे एनपीपी आणि भाजपाची युती संपुष्टात आली आहे. एनपीपीचे मणिपूर विधानसभेत सात आमदार आहेत.

कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टीने राज्यातील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पक्षाचे प्रमुख कॉनराड संगमा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. एनपीपीने पत्रात म्हटलं आहे की, आम्हाला ठामपणे वाटतं की बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मणिपूर राज्य सरकार संकटाचे निराकरण करण्यात आणि सामान्य स्थिती पूर्ववत करण्यात अपयशी ठरलं आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूर राज्यातील बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दिलेला पाठिंबा तात्काळ काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एनपीपीने बिरेन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला असला तरी राज्यात भाजपाचेच सरकार कायम राहणार आहे. मणिपूर विधानसभेत भाजपाकडे बहुमत आहे. त्यामुळे एनपीपीने जरी पाठिंबा काढला तरी सरकारला कोणताही धोका नाही. तसेच जनता दल (संयुक्त) च्या पाच आमदारांचाही भाजपाला पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. मात्र, एनपीपीच्या या निर्णयाने भाजपला धक्का बसला आहे.