महाराष्ट्रातील त्रिकुट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही; सुप्रिया सुळे यांचा महायुतीवर निशाणा

इंदापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर निशाणा साधला. महाराष्ट्र महागाईने होरपळत आहे. राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत. मात्र, सत्तेत असलेल्या त्रिकुटांने तोंडातून एकही शब्द काढला नाही. हे त्रिकूट अमित शाह यांना प्रचंड घाबरते, असा हल्लाबोलही सुप्रिया सुळे यांनी केला. या त्रिकूटामुळे महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात दुसऱ्या तिसऱ्या स्थानी होता. तो आज आपला 11 वर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील त्रिकुट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही, असा टोलाही त्यांनी महायुतीतील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना लगावला.

रायगडावर जाऊन शिवरायांच्या पायाशी तुतारी अर्पन करुन सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात जनतेने प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे उद्या राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार मी खात्री देते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ही सीट निवडून आल्यात जमा आहे, असेही सुळे म्हणाल्या.

गद्दार या शब्दाला महाराष्ट्राने कधी माफ केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दारांचे हात कापण्याचे देखील आदेश दिले होते असे सुळे म्हणाल्या. मराठी माणसाला फसवलेलं, गद्दारी केलेली आवडत नाही. पवार साहेबांना फसवण्याचं, गद्दारी करण्याच काम ज्यांनी केलं त्यांना महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात शिक्षा होणार असल्याचे सुळे म्हणाल्या.