शिंदे पिता-पुत्राचा असा पराभव करा की, भविष्यात गद्दारी करण्याचे कोणी धाडस करणार नाही; शरद पवार यांचा घणाघात

माढा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील, मोहोळ विधानसभेचे राजू खरे, पंढरपूर विधानसभेचे अनिल सावंत, माळशिरस विधानसभेचे उत्तम जानकर यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गद्दारांवर हल्लाबोल केला. पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून बबनदादा शिंदे यांना आजवर सर्व मदत केली. जेव्हा मला साथ देण्याची गरज होती तेव्हा ते ईडीला घाबरुन दुसऱ्या पक्षात पळून गेले. अशा गद्दार आणि पळपुट्या पिता पुत्राचा विधानसभा निवडणुकीत असा पराभव करा की पुन्हा गद्दारी करण्याचे कोणी धाडस करणार नाही असा घणाघात शरद पवार यांनी केला.

शरद पवार म्हणाले, शिंदेंना गेली चाळीस वर्षे आपण साथ दिली. पक्ष आणि मी अडचणीत आल्यानंतर शिंदेंनी मला साथ देणे अपेक्षित होते. मात्र ईडी ची नोटीस आल्याचे कारण देत पक्ष सोडून पळून गेले. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून पळून जाणाऱ्या या गद्दारांचा माढयातील मतदारांनी असा पराभव करावा की भविष्यात पवारांशी गद्दारी करण्याचे कोणी धाडस करणार नाही, असे आवाहन पवार यांनी मतदारांना केले.

मी जेव्हा माढा लोकसभेचा खासदार झालो तेव्हा बबनराव शिंदे यांच्यावर विश्वास टाकत मतदारसंघाचा विकास निधी खर्च करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना दिले होते. पण ऐन अडचणीच्या काळात त्यांनी साथ सोडली. पक्ष फुटल्यानंतर शिंदेंसह सोडून गेलेल्या सर्वानाच इशारा देताना त्यांनी अंतुले मुख्यमंत्री असताना 58 पैकी 52 आमदार फुटले होते. त्यावेळी पुढील निवडणुकीत त्या सर्व 52 आमदारांच्या विरोधात नवीन चेहऱ्यांना संधी दिली आणि सर्व फुटीर आमदारांचा पराभव केल्याची आठवण सांगून त्याचीच पुनरावृत्ती माढ्यात करून अभिजित पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

‘नाद कोणाचाही करा पण माझा करू नका’ असा इशारा पवारांनी दिला. रणजीत शिंदे यांना असे पाडा की माढ्यातून संपूर्ण राज्यात संदेश गेला पाहिजे, असे आवाहन पवार यांनी मतदारांना केले.