माझ्या कोळीवाड्यांचं अस्तित्व मी अदानींना पुसू देणार नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पालघर-बोईसर विधानसभा मतदरासंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयेंद्र दुबळा (पालघर) आणि विश्वास वळवी (बोईसर) यांच्या प्रचारार्थ बोईसरमधील जाहीर सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना संबोधित केले. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
ते म्हणाले आहेत की, ”वाढवण आणि मुरबे बंदर जर तुम्हाला नको असे तर किती कोणीही आला तरी मी आपलं सरकार आल्यानंतर ते होऊ देणार नाही. मी विकासाच्या नाही विनाशाच्या विरुद्ध आहे. मला पालघरच्या विकास करून पाहिजे. पालघर हा सुंदर जिल्हा आहे. येथे किनारपट्टा आहे, जिथे माझे कोळी बांधव आहेत, इथे छान पर्यटन येऊ शकतं. येथे जव्हार सारखं ठिकाण असून तिथे हिलस्टेशन होऊ शकतं. येथे बंदर करण्यापेक्षा चांगली जागा बघून एअरपोर्ट करायला हवा. यामुळे येथे उद्योजक, पर्यटन आणि चांगल्या शाळा येतील.”
वाढवण आणि मुरबे हे बंदर जर तुम्हाला नको असेल, तर यावेळी आपले दोन्ही उमेदवार निवडून द्या. सरकार आणल्यानंतर मी बघतो कोणाची हिम्मत होते तुमच्या वाढवणला हाथ लावायची. नुसतं आंदोलन करून चालणार नाही. शिवसेना आंदोलन करायला कधीही तयार असते, मात्र अधिकारही हातात असायला हवेत, असंही ते म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ”आज फक्त वाढवण बंदराला धोका नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आहे. मुंबईसह जे सात जिल्हे किनारपट्टीवर आहेत, या सगळ्या किनारपट्टी, कोळीवाडे आणि गावठणचा हे क्लस्टरच्या माध्यमातून विकास करायचा बघत आहेत. क्लस्टर म्हणजे झोपडपट्टीला एकत्र करायचं. उंच बिल्डिंग बांधून सगळ्यांना त्यात टाकून द्यायचं आणि बाकीच्या जागेवर बिल्डर त्यांचे टॉवर बांधून पसार होणार. कोळीवाड्यांचे अस्तित्व पुसून टाकण्यासाठी तुम्ही या महाराष्ट्रद्रोह्यांना मत देणार आहात का? आपलं सरकार आल्यानंतर मी सगळ्यात आधी त्यांचा तो आदेश फाडून फेकून देणार आहे. कारण माझ्या कोळीवाड्यांचं अस्तित्व मी अदानींना पुसू देणार नाही.”
गेल्या यावेळी पालघर आपण जिंकलो होतो. पालघरमध्ये चिंतामण यांच्या घराण्याचा मान राखत श्रीनिवास यांना आपण निवडून दिलं. नंतर श्रीनिवास तिकडे गेले आणि आता त्यांचा वापर करून फेकून दिलं आहे. वापरा आणि फेका, हीच त्यांची वृत्ती आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
– महिलांना मान, सुरक्षा, आदर आणि 3000 रुपये महाविकास आघाडीचे सरकार देणार आहे.
– मुलींना जसं शिक्षण मिळतं, तसंच मोफत शिक्षण महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला देणार.
– शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्त करणार.
– पंकजा मुंडे एका सभेत म्हणाल्या की, भाजपचं काम लय भारी असतं. महाराष्ट्रात 90 हजार बूथ आहे, यात विशेष पालघर परिसर आहे. येथे गुजरातमधून भाजपचे लोक येऊन बसले आहेत. तुमच्यावर लक्ष ठेवायला हे लोक गुजरातमधून येऊन बसले आहेत.