गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणी मोठा खुलासा, ISI कनेक्शन उघड

गुजरातमधील पोरबंदर येथे शुक्रवारी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले. या ड्रग्ज प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. ड्रग्सची ही खेप पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने भारतात पाठवली असल्याचा गुजरातच्या तपास यंत्रणांना संशय आहे. या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करणारा पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय ड्रग डीलर हाजी सलीम याचे नाव समोर येत आहे.

याआधीही कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात हाजी सलीमचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. हाजी सलीम हा डी कंपनी आणि दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीय मानला जातो. सलीम पाकिस्तानातून दाऊद इब्राहिमनचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज व्यापार सांभाळतो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील हेरॉईन आणि इतर ड्रग्ज व्यापाराशी सलीमचा संबंध आहे. यामुळेच हाजी सलीम नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि अनेक देशांच्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहे.

गुजरातमधील पोरबंदरजवळ एनसीबी आणि एटीएसच्या संयुक्त कारवाईत 700 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी आठ इराणी नागरिकांना अटक करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे बेकायदेशीर जहाजे रोखण्यासाठी ‘सागर मंथन-4’ ऑपरेशन सुरू केले होते. या ऑपरेशनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.