गंमत कराल तर जंमत होईल! बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही; अजित पवार यांचा उपरोधिक इशारा

‘‘लोकसभेला गंमत केली. त्याबद्दल आता मी काही बोलत नाही; पण आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमचीच जंमत होईल,’’ असा उपरोधिक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीकरांना दिला.

अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील गावांत प्रचार दौरा काढला. त्या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना हा इशारा दिला. ‘‘काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही, हे लक्षात घ्या,’’ असेही ते म्हणाले.

अजित पवार म्हणाले, ‘‘दीड वर्षाने मी निवडणूक लढवणार नाही आणि खासदारही होणार नाही, असे साहेबांनी सांगितले आहे. त्यांच्यानंतर कोण बसणार आहे, याचा विचार करा. कुणात एवढी धमक आहे, कुणात एवढी ताकद आहे, कोण शब्दाचा पक्का आहे. एवढे आमदार आहेत. पण माझ्याप्रमाणे कोणी करोडो रुपये अपापल्या भागासाठी नेऊ शकले नाही. मी काही चुका केलेल्या नाहीत. भावनिक होऊ नका.’’