खर्च लपवण्यासाठी भाजपने कलिना कार्यालयाची ‘आग लपवली‘! 40 लाख खर्चाची मर्यादा दडपण्याचे कारस्थान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मुंबईत कोटय़वधींची बेहिशेबी रोख रक्कम, सोने-चांदी पोलिसांकडून जप्त केले जात असताना अवाढव्य खर्च लपवण्यासाठी भाजपने आपल्या कलिना विधानसभा प्रचार कार्यालयाला लागलेली आग जाणीवपूर्वक लपवल्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यालयाला शनिवारी पहाटे आग लागल्याचे समजते, मात्र हा प्रकार समोर आल्यास या कार्यालयावर कोटय़वधींचा खर्च समोर येऊन निवडणूक आयोगाकडून कारवाई होईल, याच भीतीने जाणीवपूर्वक ही आग लपवल्याचे बोलले जात आहे.

कलिना येथे भाजपने तब्बल सुमारे तीन हजार स्क्वेअर फूट जागेत निवडणूक प्रचार कार्यालय थाटले आहे. या ठिकाणी सहाहून जास्त एसी असून शौचालय आणि काही केबीनची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या आगीची कोणत्याही प्रकारची नोंद मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे करण्यात आलेली नाही.

40 लाख खर्चाची मर्यादा ओलांडली

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना 40 लाखांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र भाजप उमेदवाराकडून या ठिकाणी अवाढव्य कार्यालय थाटण्यात आले आहे. हा प्रकार लपवण्यासाठीच आगीची बातमी लपवल्याचे बोलले जात आहे.