महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत आलेल्या मिंधे सरकारविरोधात राज्यातील जनतेत प्रचंड रोष धगधगत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी होणाऱया महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे याचा प्रत्यय येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची प्रचंड धडाकेबाज प्रचार सांगता सभा रविवार 17 नोव्हेंबर रोजी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सायंकाळी 5.30 वाजता होत आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आसुड कडाडणार आहे. या सभेतून राज्यात बदल घडवून महाराष्ट्र जिंकण्यासाठी सज्ज झालेल्या महाविकास आघाडीकडून ‘मिंधे सरकार चले जाव’चा इशारा दिला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागात जाहीर सभा तसेच झंझावती प्रचार दौरे करत महाराष्ट्र पिंजून काढत उद्योगपती आणि कंत्राटदारांचे हित जोपासणाऱया मिंधे सरकारविरोधात मतदारांत जागृती केली. महागाई, बेरोजगारी आणि त्यात महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचे भाजपचे धोरण, शेतमालाला भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना निवडणुकीच्या तोंडावर फसव्या घोषणा करून सत्ताधाऱ्यांकडून फसवणूक
सुरू असल्याचे राज्यातील जनतेच्याही लक्षात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची रविवार 17 नोव्हेंबर रोजी मुंबईत बीकेसी येथे जाहीर सभा होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, नसीम खान यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सभेची तयारी जोरात
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची शेवटची सभा मुंबईत होणार आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय वर्तुळातदेखील याबाबत उत्सुकता आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली.
स्थळ बीकेसी फटाका मैदान
वेळ सायंकाळी 5.30 वाजता