मिंधे सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालतंय! चिदंबरम यांचा जोरदार प्रहार

महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी मोठय़ा उद्योगांनी सामंजस्य करारही केले, प्रकल्पासाठी जागा निश्चित केली. रायगडमधील बल्क ड्रग प्रकल्प, तळेगावचा सेमीकंडक्टरचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, नागपूरला होणारा टाटा एअरबस प्रकल्प हे रोजगार देणारे मोठे प्रकल्प दुसऱया राज्यात गेले. महाराष्ट्रातील भाजप सरकार गुजरातच्या इशाऱयावर चालते, असा जोरदार प्रहार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज केला.

पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर शरसंधान सोडले. भाजपच्या राजवटीत महाराष्ट्राची अधोगती कशी झाली हे त्यांनी आकडेवारीसह सादर केले.

महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 9.6वरून 7.6 टक्क्यांवर घसरले आहे. कृषी क्षेत्रात 4.5 टक्क्यांवरून 1.9पर्यंत घसरण झाली आहे. सेवा क्षेत्रात 13 टक्क्यांवरून 8.8 टक्के, बांधकाम क्षेत्रात 14.5 टक्क्यांवरून 6.2 टक्के घसरण झालेली आहे. वित्तीय तूट वाढली असून सरकार पैसे खर्च करत आहे, पण कोणत्याही क्षेत्रात वृद्धिदर वाढलेला दिसत नाही.

महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 9.6 टक्क्यांवरून 7.6 टक्क्यांवर घसरले आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण झाली असून कर्नाटक, तेलंगाणा, तामीळनाडू, गुजरात, हरयाणा ही राज्ये पुढे गेली आहेत. महाराष्ट्राचे प्रकल्प दुसऱया राज्यात गेल्याने गुंतवणूक व रोजगारही गेले. शेतकरी संकटात असल्याने आत्महत्या वाढल्या आहेत. महाराष्ट्रात आज बेरोजगारीची समस्या अत्यंत बिकट असून बेरोजगारीचा दर 10.8 टक्के आहे. नोकरी करणाऱयांच्या संख्येत 40 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत घरसण झाली आहे, तर 40 टक्के लोक स्वयंरोजगार करत आहेत. 18 हजार पोलीस भरतीसाठी 11 लाख अर्ज आले होते, तर 4 हजार 600 तलाठी पदांसाठी 11.5 लाख लोकांनी अर्ज केले होते. यातून बेकारीची अवस्था किती गंभीर आहे हे स्पष्ट होते, असे चिदंबरम म्हणाले.