गद्दारांचं करायचं काय? पाडा, पाडा आणि पाडा, शरद पवारांनी भरसभेत दिले आदेश

वाईमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रचार सभा सुरू असताना भरसभेत शरद पवार यांना एक चिठ्ठी आली, गद्दारांचं करायचं काय? ती चिठ्ठी सभेत दाखवत गद्दारांना पाडा, पाडा आणि पाडा, असे आदेशच शरद पवार यांनी दिले. त्यावेळी उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फूट पाडणाऱयांच्या विरोधात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी वळसे पाटलांना गद्दार म्हणून पाडण्याचे आवाहन केल्यानंतर सातारा जिह्यातील वाई येथील भरसभेत शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली.

वाईमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार मकरंद पाटील आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी वाईमध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी गद्दारांना पाडा आणि पिसाळ यांना निवडून आणा असे आवाहन केले.

महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडून प्रश्न सुटत नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेचे मला आभार मानायचे आहेत. लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर भाजपच्या लक्षात आले आणि मग त्यांनी काही निर्णय घेतले. लाडकी बहीण त्याचाच भाग. आमच्या मनात हीच शंका आहे की, मध्य प्रदेशप्रमाणे हासुद्धा निर्णय मागे पडेल, असे शरद पवार म्हणाले.

वाईतील लोकांच्या भावना समजल्या; लोक म्हणतात आमचं ठरलंय

लोकसभेच्या धामधुमीत शरद पवार वाईमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या कुटुंबातील लग्नासाठी उपस्थित राहिले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, मी मकरंद पाटील यांच्या घरातील लग्नात गेलो. सगळे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. मी उशिरा आलो. त्यावेळी मोठमोठय़ा टाळय़ा आणि घोषणा होत होत्या. त्याचवेळी मला वाईतील लोकांची भावना समजली होती. आताच्या सभेला बसायला जागा नाही. लोक म्हणतात आमचं ठरलंय, असे शरद पवार म्हणाले.

स्त्रियांवर होणाऱया अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. राज्यातून अनेक मुली गायब होत आहेत, बेपत्ता होत आहेत. लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा तुम्ही अशी ठेवता? महिलांच्या सन्मानाबाबत आम्ही कधीही तडजोड केली नाही, असे खडेबोल शरद पवार यांनी मिंधे सरकारला सुनावले.

याआधी लोकसभेला राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या, काँग्रेसला एक मिळाली. आम्ही अस्वस्थ होतो. त्यानंतर आम्ही ठरवलं, येणारी निवडणूक एकत्र लढायची. त्या निवडणुकीत आम्हाला यश मिळाले. त्यानंतर आता विधानसभेची निवडणूक आली. प्रश्न खूप आहेत. गेली दहा वर्षे महाराष्ट्राची सत्ता भाजप आणि त्यांच्या मित्रांच्या हातात आहे. लोकसभेच्या  निकालानंतर त्यांना समजलं, लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना आणली’ असे शरद पवार म्हणाले.