सब बाटने के बाद भी नहीं जम रहा हैं, म्हणून आता ते ‘बटेंगे तो कटेंगे’ वर आले आहेत; जयंत पाटील यांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मेहबूब शेख यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ वर जोरदार प्रहार केला. सब बाटने के बाद भी नहीं जम रहा हैं, म्हणून आता ते ‘बटेंगे तो कटेंगे’ वर आले आहेत, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील यांनी एक्सवर याबाबच पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आष्टी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मेहबूब शेख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेस संबोधित केले.

सब बाटने के बाद भी नहीं जम रहा हैं, म्हणून आता हे “बटेंगे तो कटेंगे” वर आले आहेत. महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी साम दाम दंड भेद सगळ्याच गोष्टींचा वापर होतोय. प्रतिकूल परिस्थितीत पक्षातला एक आदरणीय पवार साहेबांच्या मागे ठामपणे उभा राहिला. तो म्हणजे मेहबूब शेख. माणूस विचारांचा पक्का पाहिजे. जातपात धर्मभेद बाजूला सारून आपण काम केले पाहिजे या एका विचाराने तो पुढे जात आहे.

या मतदारसंघात निनावी पत्रे वाटून हिंदू धोक्यात आहेत असा भास निर्माण केला जातोय. अहो, तुमचा नेता विश्र्वगुरू झाला आहे. त्यांना हिंदूंचे संरक्षण करणे जमत नाही? अंतरावली सराटीमध्ये शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर तुम्ही लाठीहल्ला घडवला. आमच्या आया बहिणींची माथी फोडली. खरतर या सरकारपासून लोकं सुरक्षित नाहीत. निवडणुका लढवणं आणि जिंकण कठीण वाटतेय म्हणून यांना धर्म आठवतोय.

पाटोदा ला 35 वर्षांपूर्वी एमआयडीसी साठी जागा राखीव केली गेली मात्र एमआयडीसी झाली नाही. कुंटेफळ आणि इतर योजनांना चालना देण्याचे काम महाविकास आघाडी सरकार असताना मी स्वतः केले. 2024 पर्यंत येथे पाणी आलं पाहिजे हा आमचा निग्रह होता. मात्र सरकार बदललं आणि यावर काहीच काम झाले नाही. आता आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत आमदार म्हणून मेहबूब शेख त्या योजनेचे उद्घाटन करतील हा मी तुम्हाला शब्द देतो.

मला आनंद आहे, इथले शेतकरी बांधव कांदे विकून, सोयाबीन विकून स्वत:च्या कष्टाचे पैसे मेहबूबला निवडणुकीसाठी देत आहेत. अल्पसंख्याक समाजातील मेहबूब यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढण्याचे काम केले आहे. त्याला तुम्ही संधी दिली तर तो विधानसभा गाजवेल. या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी पवार साहेब पूर्ण ताकद मेहबूब शेखच्या मागे उभी करतील. विश्वगुरुनांही हिंदूचे रक्षण करणे का जमत नाही, असा सवालही जयंत पाटील यांनी केला.