सुखबीर सिंग बादल यांनी शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

शिरोमणी अकाली दलचे (एसएडी) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्षाच्या कार्यकारिणीकडे सुपूर्द केला आहे. बादल यांनी त्यांच्या नेतृत्वाच्या काळात मिळालेल्या पाठिंब्याबद्दल पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

सुखबीर सिंग बादल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचबाबत माहिती देताना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा म्हणाले की, “पंजाबमधील परिस्थिती वाईट आहे. आमचे तरुण कार्यकर्ते तुरुंगात आहेत, शेती संकटात आहे आणि चंदीगडचा काही भाग हरियाणाला दिला जात आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी हा बदल आवश्यक आहे.”

सध्या ज्येष्ठ नेते बलविंदर सिंग भुंदर हे कार्याध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. भुंदर हे बादल कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जातात.

दरम्यान, सुखबीर बादल यांच्या राजीनाम्यानंतर शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीची लवकरच नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक होणार आहे. पक्षातील तरुण आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये समतोल निर्माण करून नवे नेतृत्व निवडले जाईल, असं सांगण्यात येत आहे.