निमित्त – सलोखा, समानतेचा प्रकाश उत्सव

>> वर्षा चोपडे

सांप्रदायिक एकता, शांतता, सद्भावना वाढवणारे आणि जगभरात शीख समुदायाची स्थापना करणाऱया श्री गुरू नानक देवजी  यांनी कायम समानतेचा धर्म शिकवला. म्हणूनच गुरू नानक जयंती दिनाला प्रकाश उत्सव असे संबोधिले जाते.

हिंदुस्थान खूप भाग्यवान आहे. इथल्या मातीत अनेक महान संतांचा जन्म झाला आणि त्यांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. सांप्रदायिक एकता, शांतता, सद्भावना वाढवणारे आणि जगभरात शीख समुदायाची स्थापना करणाऱया श्री गुरू नानक देवजी यांचा 15 नोव्हेंबर 2024 हा जयंती दिन.

पाकिस्तान येथील गुरुद्वारा नानक यांचे जन्मस्थान मानले जाते. माननीय कल्याणचंद दास बेदी ऊर्फ मेहता कालू आणि तृप्ता यांचे पुत्र म्हणजे श्री गुरू नानक देवजी. सुलक्खनी देवी हे त्यांच्या पत्नीचे नाव होते. त्यांनी 15 व्या शतकात शीख धर्माची स्थापना केली. त्यांनी 20 वर्षे 45 हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांची तत्त्वे आणि नियमांचा प्रचार केला व एक संन्यासी म्हणून जगले. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या परंपरा व तत्त्वे यांचा अभ्यास करून शीख धर्माची स्थापना केली.

एकदा गुरू नानक देवजीं गंगेच्या काठावर उभे होते. त्यांनी पाहिले की काही लोक पाण्याच्या आत उभे राहून सूर्याला पाणी अर्पण करून स्वर्गातील त्यांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना करीत आहेत. गुरू नानकजींनीही आपल्या दोन्ही हातांनी पाणी ओतण्यास सुरुवात केली, परंतु ते पूर्वेकडील त्यांचे राज्य पंजाब असलेल्या दिशेने उभे राहिले. जेव्हा लोकांनी हे पाहिले आणि त्यांना त्यांची  चूक सांगितली आणि नानकांना तसे वागण्याचे कारण विचारले तेव्हा नानकजी म्हणाले, “जर गंगा मातेचे पाणी स्वर्गात तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचू शकते, तर ते पंजाबमधील माझ्या शेतात का पोहोचू शकत नाही? पंजाबपासून स्वर्ग तर फार जवळ आहे. जिवंत असताना वडीलधाऱयांची सेवा करा, त्यांचा आदर करा. प्रार्थना करणे वाईट नाही, पण जीवनाचा अर्थ समजून घ्या.” लोकांना आपली चूक समजली. भगवंताचे नामस्मरण, गरजूंना मदत करणे, कोणतेही शोषण किंवा फसवणूक न करता प्रामाणिकपणे जीवन जगणे हा जीवन जगण्याचा साधा मार्ग आहे, त्यात खरे सुख आहे असे त्यांनी सांगितले.

एकदा एका श्रीमंत माणसाला प्रश्न पडला की देव आहे की नाही आणि आहे तर तो कुठे आहे. रोज सकाळी, जेवणाच्या वेळी, रात्रीच्या वेळीही तो प्रार्थना करत असे. तो लोकांना म्हणायचा, “जर कोणी मला सांगू शकेल की देव कुठे आहे, तर मी त्यांना शंभर सोन्याची नाणी देईन.” लोक त्याला सांगायचे, देव डोंगरात आहे. देव आकाशात आहे. देव स्वर्गात आहे. देव समुद्रात आहे. देव दूरच्या देशात आहे. सोन्याच्या लालसेने अनेकांनी त्याला देवाचे पुरावे देण्याचे प्रयत्न केले, पण व्यर्थ. त्याचे समाधान झाले नाही.

एके दिवशी एक व्यक्ती त्याच्याकडे आला. तो अतिशय शांत आणि नम्र व्यक्ती म्हणून परिचित होता. तो या श्रीमंत माणसाला म्हणाला, “महाराज, देव कुठे आहे हे मला माहीत आहे.” श्रीमंत माणूस म्हणाला, “खरंच? कृपया मला सांगा! देव कुठे आहे?” तो व्यक्ती म्हणाला, “मला फक्त तुम्ही  एका भांडय़ात  दूध आणून द्या.”

त्याच्या नोकराने लगेच एका भांडय़ात दूध आणले. तो व्यक्ती म्हणाला, “तुम्ही दुधाच्या भांडय़ात हात घालावा अशी माझी इच्छा आहे.” म्हणून त्याने दुधात हात घातला. तेव्हा ज्ञानी व्यक्तीने त्याला विचारले, “दुधात काय आहे?” “दुधात काहीही नाही, ते फक्त एक वाटी दूध आहे.” म्हणून त्याने त्याला पुन्हा विचारले, “तुला खात्री आहे का, तिथे फक्त दूध आहे?” श्रीमंत माणूस म्हणाला, “ नाही, दुधात काहीच नाही. ते फक्त दूध आहे.” तेव्हा तो व्यक्ती  म्हणाला, “ठीक आहे. तू तुझ्या हाताने हे दूध ढवळावे अशी माझी इच्छा आहे आणि बरेच वेळ ते ढवळावे लागेल.” श्रीमंत  व्यक्ती तयार झाली. बरेच वेळ ढवळल्यावर त्या दुधात मलाई दिसू लागली. “याचा अर्थ काय? मला समजले नाही. तुम्ही कोणता मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहात? देव कुठे आहे?” यावर तो ज्ञानी मनुष्य म्हणाला, “महाराज, देव फार दूर नाही. देव तुमच्या आत आहे आणि कधी कधी आपल्याला स्वतला आपले मन, आपले हृदय, आपल्या भावना, आपल्या आत्म्याचे या दुधासारखे मंथन करावे लागते. आपल्याला फक्त नाम, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू जपायचे आहेत. तो जप मंथनासारखा आहे, दुधाच्या मंथनासारखा आहे. कालांतराने, आपल्याला दिसेल की देव आपल्या आत आहे. दुधात जसे मलई, लोणी असते तसेच देव आपल्या आत असतो.” श्रीमंत माणसाने याबद्दल सखोल विचार केला, तेव्हा त्याने गुडघे टेकले आणि त्या ज्ञानी मनुष्याला नमस्कार केला. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, “मला सांगा, तुम्हाला या सगळ्या गोष्टी कोणी शिकवल्या?” ज्ञानी माणसाच्या डोळ्यांत चमक आली. तो म्हणाला, “आम्ही गुरू नानकांचे विद्यार्थी आहोत आणि गुरू नानकांनी आम्हाला या गोष्टी शिकवल्या. ते आपल्याला सांगतात की, देव दूर नाही. देव फक्त आकाशात किंवा स्वर्गात नाही, तर देव आपल्या आत आहे. चांगल्या कर्मात, सेवेत आहे.” त्या व्यक्तीने गुरू नानक देवास नमन केले व सेवेचा मार्ग स्वीकारला.

गुरू नानक यांचे 22 सप्टेंबर 1539 रोजी पाकिस्तानातील कर्तारपूर येथे निधन झाले आणि त्यांचा मृतदेह कधीही सापडला नाही. अंत्यसंस्कार कुठल्या पद्धतीने व्हावे यासाठी हिंदू आणि मुस्लिम भक्तांमध्ये वाद झाले तेव्हा आपल्या मृत्यूपूर्वी गुरू नानकांनी हिंदूंना त्यांच्या उजव्या बाजूला फुले ठेवण्यास सांगितले आणि मुस्लिमांना त्यांच्या डाव्या बाजूला फुले ठेवण्यास सांगितले. ते म्हणाले की, “जर त्यांच्या उजव्या बाजूची फुले सकाळच्या वेळी ताजी असतील तर त्याचा मृतदेह जाळला पाहिजे आणि जर त्यांच्या डाव्या बाजूची फुले अद्याप ताजी असतील तर त्यांचा मृतदेह पुरला पाहिजे.” दुसऱया दिवशी लोकांनी फुले तपासली तेव्हा फुले ताजी होती, पण त्यांचे शरीर ईश्वरात विलीन झाले होते. असे म्हणतात चादरीखाली शरीर दिसले नाही केवळ फुले दिसली. पाकिस्तानात रावी नदीच्या काठावर गुरू नानकांच्या मृत्यूच्या ठिकाणी गुरुद्वारा बांधण्यात आला. गुरू नानक हिंदू किंवा मुस्लिम नव्हते, परंतु दोन्ही परंपरेतील लोक त्यांच्याकडे ओढले गेले.

‘साहिब’ हा शीख धर्माचा गुरू ग्रंथ. ‘साहिब’ची रचना प्रामुख्याने सहा शीख गुरूंनी केली होती- गुरू नानक, गुरू अंगद, गुरू अमर दास, गुरू राम दास, गुरू अर्जन आणि गुरू तेग बहादूर, ज्याला शिखांनी अंतिम, सार्वभौम आणि शाश्वत गुरू मानले आहे. नानकजी गुलामगिरी आणि वांशिक भेदाच्या विरोधात होते. त्यांनी समानतेचा पुरस्कार केला. गुरू नानक देवजींनीही हिंदुस्थानातील महिलांच्या उत्थानासाठी योगदान दिले. त्यांनी आपल्या अनुयायांना स्त्रियांचा आदर करण्यास आणि त्यांना समान वागणूक देण्यास सांगितले. त्यांना श्रीचंद व लक्ष्मी दास नावाची दोन मुले होती तरीही त्यांनी आपला शिष्य बंधू लहाना यांना उत्तराधिकारी बनवले. गुरू नानक गुरपरब किंवा गुरू नानक जयंती या दिवसाला प्रकाश उत्सव असे संबोधिले जाते. या दिवशी कथा, कीर्तन आणि लंगर भोजन यांचे आयोजन केले जाते. मध्यरात्री जन्मउत्सव साजरा होताना विशेष प्रार्थना केल्या जातात. अशा थोर संतास कोटी कोटी नमन.

[email protected]

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)