खाऊगल्ली – गिरगावच्या खानावळी अन् थाळ्या

>> संजीव साबडे

जवळपास 35 वर्षं गिरगावच्या परिसरात आाफिस होतं. त्यामुळे तिथल्या शाकाहारी व मांसाहारी रेस्टॉरंटची चव जणू पाठ झाली होती. राजा राममोहन रॉय रस्त्यावरचं व्हॉइस ऑफ इंडिया, श्रीराम बोर्डिंग, मॉडर्न लंच होम, ठाकुरद्वारच्या नाक्यावरलं सत्कार, चिरा बाजारातलं चर्च रेस्टॉरंट, खत्तर आळीतलं मराठी खानावळ, पुढे अग्यारी लेनची मराठा खानावळ आणि नंतर स्रू झालेली मालवणी स्वाद, सायबिणी गोमांतक अशी किती तरी. यात शाकाहारीचा उल्लेख केला तर आणखी 40 रेस्टॉरंटची नावं तरी लिहावी लागतील. तरीही अद्याप स्रू असलेल्या चाफेकर, पणशीकर, कोल्हापुरी चिवडा, विनय, मनोहर, मेवाड, प्रकाश दुग्ध मंदिर, तांबे, न्यू आनंद भुवन, सेंट्रल लंच होम, राजा, बंद झालेले वीरकर, कोना, मॉडर्न आणि मांसाहारी अनंताश्रम, लीलाधर ही यादीही मोठी होईल.

गिरगाव चर्चच्या रांगेत जरा पुढे असलेलं श्रीराम खूप जुनं आणि मासे खाणाऱ्याचं अत्यंत प्रिय व आवडतं ठिकाण. सर्व प्रकारचे मासे, त्यांचं कालवण वा तव्यावर तळलेले तुकडे तिथे मिळतात. जणू गोपी टँकचा मासळी बाजारच. कोळंबी, पापलेट, बांगडा, तिसऱया, रावस, जिताडा, जवळा, मोरी, माकूळ, सुरमई, हलवा, खेकडे अगदी सर्व काही. सर्वांचं कालवण एकाच प्रकारचं नसतं. तर त्याची चव माशानुसार बदलते. मासे न खाणाऱयांसाठी चिकन आणि मटण यांचे असंख्य प्रकार यांच्या मेन्यूमध्ये आहेत. इथे जेवायला मांसाहारी लोकच येतात, पण त्यांच्यासह येणाऱ्या शाकाहारींसाठीही बरेच प्रकार आहेत. गिरगावात थाळी हा प्रकार लोकप्रिय. नव्या मांसाहारी रेस्टॉरंटपेक्षा श्रीराम बऱ्यापैकी स्वस्त आहे. चर्चच्या आधी नाक्यावर व्हॉइस ऑफ इंडिया हे मस्त आणि स्वस्त रेस्टॉरंट. अनेक मित्रांच्या सुलेमानी चहा पीत मैफली रंगण्याचं हे ठिकाण. इथलं मटण व चिकन अप्रतिम. फक्त तेल कमी असं सांगावं लागतं. इथे ऑम्लेट पाव खाण्यासाठी येणाऱयांची संख्याही मोठी. शाकाहारी मंडळींसाठी शेजारी मनोहर आहे. तिथली पावभाजी खूप प्रसिद्ध. पावभाजीसाठी ते जो चटणीसारखा मसाला तयार करतात, तो तर अप्रतिम. त्याच्या पलीकडे मेवाड हॉटेल. पूर्वी दुपारी गरमागरम मिसळ आणि ताजे पाव खाण्यासाठी तिथे गर्दी असे. खिशात कमी पैसे असले की तेच आसरा.

चर्चच्या समोर मॉडर्न लंच होम. छोटंसं, पण जेवण उत्तम आणि दरही बऱयापैकी वाजवी. अनेकजण इथे सुरमई थाळी वा बोंबील थाळी मागवतात. काही जण मांदेली थाळीचे शौकीन. इथेही श्रीराम बोर्डिंगप्रमाणे समुद्रात सापडणारे सर्व जीव मिळतात. परवडणारी मटण थाळी, चिकन थाळीही आहे. तीन-चार जण गेले तर माशांचे दोन प्रकार, एखादा चिकन वा आवडीनुसार मटणाचा प्रकार असेल तर जिभेचे चोचले एकदम पूर्ण होतात. इथे पंजाबी व चायनीज प्रकारही मिळतात. चर्चकडून जगन्नाथ शंकरशेट मार्गावर काळबादेवीच्या दिशेला चालू लागलात की एक किलोमीटरवर नाथ माधव पथवर खत्तर गल्लीपाशी मराठी खानावळ आहे. इथले जेवणही उत्तम. इथली जवळा भाजी, जवळा फ्राय, खेकडा मसाला, बांगडा, पापलेट, सुरमई असलेली त्यांच्या भाषेत मच्छी कढी खास. इथली चिकन वा मटण बिर्याणी ही लखनवी वा हैदराबादी बिर्याणीपेक्षा पूर्ण वेगळी. किंचित तिखट. तसंच मटण, चिकन व वडे खूपच छान आहेत.

शाकाहारी हवं असेल तर जगन्नाथ शंकरशेट रोडवर आसपास पणशीकर व कोल्हापुरी चिवडा आहे आणि ठाकुरद्वारात वैद्य वाडीत बी. तांबे यांचं सुजाता आहे. ठाकुरद्वारातच विनय हेल्थ होम. प्रचंड मेन्यू आहे तिथे. या चारही ठिकाणी मिळणारा वडा, पियुष, मिसळ हे पदार्थ मन तृप्त करतात. ठाकुरद्वारात, म्हणजे बाबासाहेब जयकर मार्गावर शिरलात की लगेच डाव्या बाजूला आहे सत्कार रेस्टॉरंट. मत्स्यप्रेमी मंडळींचं विशेष आवडतं. ठाकूरद्वारच्या सत्कारमध्ये चिकन व मटणाचेही असंख्य प्रकार आहेत. शाकाहारी मंडळींसाठी काळ्या वाटाण्याची उसळ व अन्य अनेक प्रकारही आहेतच. पुढे काळबादेवीच्या दिशेने जाताना दादीशेठ अग्यारी लेनच्या परिसरात मराठा हॉटेल आहे. तेही मांसाहारी जेवणासाठीच प्रसिद्ध. आसपासच्या मांसाहारी रेस्टॉरंटपेक्षा इथले दर आणखी कमी आहेत आणि चवही छान. थाळी घेतली तर सुमारे अडीचशे/तीनशे रुपयांत दोघांचं जेवण होतं.

त्याच परिसरात आहे चर्च रेस्टॉरंट आहे. तिथे जवळच सेंट झेविअर चर्च असल्याने रेस्टॉरंटच्या नावातही चर्च आलं आहे. बरंच जुनं रेस्टॉरंट. बाहेरून ते इराण्याचं असावं असं वाटतं. हेही सामान्यांना परवडणारं ठिकाण. इथल्या जेवणात मासे आहेत. पण मटण, खिमा, मटण करी, सुकं मटण, चिकन व अंडय़ाचे अनेक प्रकार मिळतात. इथेही जेवण स्वस्तात होतं. लॅमिंग्टन म्हणजे भडकमकर मार्गावर असाल तर अमृत पंजाब व शबनम रेस्टॉरंटला नक्की भेट द्यावी.

आता गिरगावातली मराठी लोकसंख्या कमी कमी होत आहे. त्यामुळे शाकाहारी व जैन खाद्यपदार्थांचा प्रभाव वाढतोय.

[email protected]