गुलदस्ता – रंगतदार भेट

>> अनिल हर्डीकर

चित्रकार गुर्जर आणि कॅम्लिनचे सुभाष दांडेकर यांच्या एका भेटीने सुभाष दांडेकरांना रंगांच्या उत्पादनांच्या निर्मितीची प्रेरणा मिळाली अन् ही भेट खऱया अर्थाने ‘रंगतदार’ ठरली.

ल 1959, कॅम्लिनचे तरुण टेक्निकल डायरेक्टर सुभाष दांडेकर सुप्रसिद्ध चित्रकार गुर्जर यांना भेटायला निघाले होते. तसं पाहिलं तर कंपनीच्या नेहमीच्या कामकाजापैकीच हे एक काम होतं. या भेटीतून एका यक्षप्रश्नाचं उत्तर मिळणार असल्याची पुसटशीही कल्पना सुभाषना नव्हती.
चित्रकारांना लागणारी शाई म्हणजे ‘ड्रॉइंग इंक’ हे कॅम्लिनचं नवं उत्पादन नुकतंच बाजारात आलं होतं. ही शाई चित्रकारांनी वापरावी, तिचा मोठय़ा प्रमाणात खप व्हावा, म्हणून कंपनीचे सर्व प्रकारचे प्रयत्न चालू होते. जाहिरात कंपन्या, कला महाविद्यालये आणि चित्रकार अशा सर्वांशी कॅम्लिनचे विक्रेते संपर्क साधत होते.

या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुभाषही नामांकित चित्रकारांना स्वतः भेटत होते. चित्रकार गुर्जर यांना सुभाष यांनी कॅम्लिनच्या नव्या उत्पादनाची माहिती दिली. भारतीय बनावटीची ही शाई परदेशी शाईइतकीच उत्कृष्ट आहे असा निर्वाळा देत ही देशी शाई वापरण्याचे फायदेही त्यांनी चित्रकार गुर्जरांना सविस्तरपणे सांगितले. दोघांचे संभाषण चालू होतं. तेवढय़ात सुभाष यांनी महात्मा गांधींचं एक सुरेख पोर्ट्रेट एका भिंतीपाशी ठेवलेलं पाहिलं.

पोर्ट्रेट न्याहाळून बघत सुभाष म्हणाले, “वा, अप्रतिम! कुठले रंग वापरले आहेत?’’
काहीशा विस्मयाने सुभाषकडे पाहात चित्रकार गुर्जर म्हणाले, “अर्थात विन्सर आणि न्यूटनचेच.’’ केवळ चार शब्दांचं हे छोटंसं वाक्य सुभाषच्या मनात थेट घुसलं आणि घर करून राहिलं.

स्वदेशीचं व्रत आचरणाऱ्या, ‘देशातल्या प्रत्येक माणसाने स्वदेशी माल वापरावा’ असा आग्रह धरणाऱया आणि स्वदेशीची चळवळ देशात रुजवणाऱया महात्म्याचं चित्र परदेशी आणि तेही ब्रिटिश रंगामध्ये रंगवलं जावं? विरोधाभासाचं केवढं हे ठळक उदाहरण! स्वातंत्र्य मिळून एक तप उलटलं, तरी अजूनही चित्रांसाठी लागणारे रंग आपल्या देशात बनू नयेत, ही अगदी लाजिरवाणी गोष्ट आहे.

झालं! सुभाष दांडेकरांच्या मनाने घेतलं कॅम्लिनने आता शाई, खडू, गम, लाख, इंक या उत्पादनांव्यतिरिक्त रंगाच्या उत्पादनांची निर्मिती करण्याचं ठरवलं. पोस्टर कलर्स, वॉटर कलर्स, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल कलर्स आणि चित्रकारांना लागणारे कॅनव्हाससुध्दा.

सुभाष यांनी प्रोजेक्टची जबाबदारी स्वीकारली. सर्वप्रथम ‘रंगरसायन’ ह्या शास्त्रामध्ये संशोधन करण्यासाठी इंग्लंडमधल्या ग्लासगो युनिवर्सिटीत प्रवेश घेतला.

प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी लागणारे ज्ञान आणि इतर तांत्रिक माहिती घेतली आणि 1961 मध्ये भारतात परत आले.

अनेक अडचणी आल्या, पण प्रयत्न केल्यावर अशी कोणती अडचण असत नाही ज्याला उत्तर नाही. सरतेशेवटी 19 जानेवारी 1964 रोजी थाटामाटात उत्पादने बाजारात आणली.

आज कॅम्लिनचे रंग भरून चित्रकार चित्रे जिवंत करताहेत. वाचकहो, शोभा बोन्द्रs यांच्या ‘राग दरबारी’मधला हा भाग वाचताना वाटलं, सुभाष दांडेकर आणि चित्रकार गुर्जर यांची भेट रंगतदार नाही का ठरत?

[email protected]