‘मनसे’ म्हणजे मराठी माणसासाठी-भूमिपुत्रांसाठी लढणारा पक्ष नाही तर ‘मनसे’ म्हणजे गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढणारा पक्ष आहे, असा जबरदस्त घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दादरच्या प्रचारसभेत केला. लोकसभा निवडणुकीत ‘मनसे’ने मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र त्याच मोदींनी शिवसेनेला फोडण्याचे काम केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचे काम केले. सरकार पाडले आणि चाळीस चोर पळवले. वेदांता फॉक्सकॉन, पावणे दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि पाच लाख रोजगार गुजरातला नेले. म्हणजेच ‘मनसे’चा पाठिंबा गुजरातला जाणाऱ्या रोजगाराला आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
माहीम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महेश सावंत यांच्या प्रचारासाठी दादरच्या ऐतिहासिक खांडके बिल्डिंगच्या परिसरात आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी ‘मनसे’च्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल केली. माहीम विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक कुठेल्याही कुटुंबाची नाही तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाची असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात येणारे बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क, सोलर एनर्जी पार्क, आर्थिक केंद्र, टाटा एअरबस प्रकल्प मुंबईतून गुजरातला नेले. हे सर्व मुंबई-महाराष्ट्रातून गुजरातला नेण्यास ‘मनसे’चा पाठिंबा आहे का, असा सवाल त्यांनी केला. दोन वर्षांत पाच लाख तरुण-तरुणींच्या रोजगाराच्या संधी गुजरातला नेल्या आणि याच ‘मनसे’ने मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. तो गुजरातच्या भूमिपूत्रांच्या न्याय्य हक्कासाठी होता का, असा सवालही केला. या प्रचारसभेला तेजस ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार अनिल देसाई, माजी महापौर विशाखा राऊत, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, प्रीती पाटणकर, साईनाथ दुर्गे, काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण नाईक, काँग्रेसचे नेते राजन भोसले, सांगोला येथील किसान आर्मीचे प्रफुल कदम, भारतीय कम्युनिट पक्षाचे मिलिंद रानडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रसाद शेणकर, आम आदमी पक्षाच्या प्रणाली राऊत, शाखाप्रमुख यशवंत विचले, ज्येष्ठ शिवसैनिक सूर्यकांत बिर्जे, स्टार प्रचारक प्रियांका जोशी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
20 नोव्हेंबरची निवडणूक महाराष्ट्राच्या अस्तित्वाची!
20 नोव्हेंबरला होणारी निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे. आपले राज्य महाराष्ट्रच राहणार की अदानी राष्ट्र होणार हे यातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मुंबई रक्षणाची निशाणी मशाल आहे. त्यासाठी घाटकोपर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमदेवार शिवसेनेचे संजय भालेराव यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घाटकोपर येथील सभेत केले. गद्दारी करून सत्तेत आलेल्या खोके सरकारला आता घालवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. यावेळी खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.
मूळ दादरकरांना परत आणणार
यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार महेश सावंत म्हणाले की, त्यामुळे मला चाळकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. दादर-माहीम-प्रभादेवी भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्याचे आणि रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्याचे आणि दादरमधून विस्थापित झालेल्या मूळ रहिवाशांना परत आणणार असल्याचे सावंत म्हणाले.
खांडके बिल्डिंग आणि शिवसेनेचे नाते
माजी महापौर व उपनेत्या विशाखा राऊत यांनी दादरची खांडके बिल्डिंग आणि शिवसेनेचे नाते विषद केले. खांडके बिल्डिंगमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे वास्तव्य होते. प्रबोधनकारांनी या ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू केला. खांडके बिल्डिंगमधील अशोककाका कुलकर्णी व पद्माकर अधिकारी यांचे शिवसेनेचे ऋणानुबंध सांगितले.
बंदूक रोखणाऱ्याला तुरुंगात टाकणार
या निवडणुकीत गद्दारांना सोडणार नाही. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत माहीमकरांवर बंदूक रोखणाऱ्या आणि पोलीस ठाण्यामध्ये गोळ्या झाडणाऱ्याला आपण सोडणार नाही. 23 नोव्हेंबरला आमचे सरकार आल्यावर 24 तारखेला यूएपीए अतिरेकी कायद्याखाली अटक करून आत टाकणार, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.