पर्थच्या वेगवान खेळपट्टीला सामोरे जाण्यापूर्वीच ‘टीम इंडिया’वर दुखापतींचा मारा झाला आहे. पर्थच्या वॅकावर होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी हिंदुस्थानी क्रिकेटपटू वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर लढण्यासाठी स्वतःला सज्ज करत असताना विराट कोहली, सरफराज खान व लोकेश राहुल यांना दुखापत झाल्याने हिंदुस्थानी संघाला मोठा धक्का बसला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी कडवा संघर्ष सुरू होण्याआधीच आलेल्या दुखापतींच्या ग्रहणामुळे हिंदुस्थानी संघव्यवस्थापन काळजीत आहे.
विराट कोहलीला सौम्य दुखापत?
ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यावर हिंदुस्थानी संघाला स्टार फलंदाज विराट कोहलीकडून खूप आशा आहेत. मात्र विराटलाच दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. सिडनी मार्ंनग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, कोहली त्याच्या दुखापतीचे स्कॅनिंग करण्यासाठी रुग्णालयात गेला होता. मात्र त्याला कुठे दुखापत झाली आणि ती कोणत्या प्रकारची आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी त्याची दुखापत सौम्य असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. जर त्याची दुखापत गंभीर असती तर कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच ‘टीम इंडिया’ला विराट धक्का बसला असता.
सरफराज, राहुलने वाढविले टेन्शन
‘टीम इंडिया’चा मधल्या फळीतील नवा फलंदाज सरफराज खानला गुरुवारी (दि. 14) पर्थच्या वाका येथे सरावसत्रा दरम्यान नेटमध्ये फलंदाजी करताना कोपराला दुखापत झाली. ‘फॉक्स क्रिकेट’ने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सर्फराज नेटमधून उजवा हात धरून तोंड वेडेवाकडे करत बाहेर पडताना दिसत होता. या वेळी तो काहीसा अस्वस्थही वाटतोय. मात्र सरफराजची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप समजलेले नाही. सरफराजप्रमाणे लोकेश राहुललाही शुक्रवारी सकाळी पर्थ येथे सराव करताना दुखापत झाली. त्याचा उजव्या हाताचा कोपरा दुखावला गेला. त्यामुळे हिंदुस्थानी संघातील टेन्शन वाढले आहे. त्याआधी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान ‘अ’ संघ पर्थमध्ये इंट्रा स्क्वॉड सामना खेळणार होता. तो सामनाही रद्द झालाय. त्यामुळेच हिंदुस्थानी संघाने पर्थमध्ये सेंटर विकेट मॅच सिम्युलेशनचा सराव करण्याचा निर्णय घेतला. मात्र सरावादरम्यानच खेळाडू जायबंदी व्हायला लागल्याने ‘टीम इंडिया’च्या मोर्चेबांधणीची घडी विस्कटणार आहे.
रोहित पर्थवर खेळण्याची शक्यता
‘टीम इंडिया’चा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्याने अजूनही मुंबईतच आहे. तो आस्ट्रेलिया दौऱ्यावरील सलामीच्या कसोटीत खेळण्याबाबत साशंकता कायम आहे. मात्र संघावर ओढावलेल्या दुखापतींच्या ग्रहणामुळे त्याला पर्थ गाठावे लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्थ कसोटी खेळण्याची तयारी जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान करत होता. मात्र राहुल व सरफराज यांना दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या नव्हे तर पहिल्याच कसोटीत रोहितची संघाला आवश्यकता आहे. पर्थ कसोटीला 22 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असून रोहितच्या पर्थ कसोटीत खेळण्याबाबत शनिवारपर्यंत स्पष्ट संकेत मिळतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. .