संजू, तिलक शतकाधिश! हिंदुस्थानने विदेशी भूमीवर रचला धावांचा एव्हरेस्ट

चौथा टी-20 सामना अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक ठरला. एकाच डावात दोन शतके ठोकण्याचा विश्वविक्रम, एका डावात 23 षटकारांचा विश्वविक्रम, विदेशी भूमीवरचा 283 हा सर्वोच्च स्कोर, दुसऱ्या विकेटसाठी 210 धावांची सर्वोच्च अभेद्य भागी, एका वर्षात तीन शतके ठोकणारा एकमेव फलंदाज, सलग सामन्यात शतक ठोकणारा तिसरा फलंदाज, असे एकापेक्षा एक विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात हिंदुस्थानी संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी रचले आणि वांडरर्स स्टेडियमवर वंडरफुल विश्वविक्रम साजरे केले.

गेल्या सामन्यात घणाघाती अर्धशतक ठोकणाऱ्या अभिषेक शर्माने आज संजू सॅमसनच्या साथीने 73 धावांची सलामी दिली. यात अभिषेकने 4 षटकारांचा वर्षाव करत 36 धावा चोपल्या होत्या, पण तो बाद झाल्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्माने आफ्रिकन गोलंदाजांची न भूतो न भविष्यति अशी पिसे काढली. या दोघांनी एकेक विक्रमांचा अक्षरशः चुराडा करत नवनवे विश्वविक्रम प्रस्थापित केले. दोघांच्या फटकेबाजीचा वेग इतका भन्नाट होता की, त्यांनी 9 ते 15 या 7 षटकांत 130 धावा चोपत संघाला द्विशतकापार नेले.

संजूचा शतकांचा विश्वविक्रम

पहिल्या टी-20 सामन्यात शतक झळकावताना संजूने सलग दुसरे शतक ठोकण्याचा पराक्रम केला होता. तेव्हा टी-20 त सलग शतके झळकावणारा तो दुसरा फलंदाज होता तर आज तिलकनेही त्याच्या या पराक्रमाची बरोबरी साधली. मात्र आजही संजूने शतक झळकावत एकाच वर्षात तीन शतके ठोकण्याचा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला. याआधी अशी कामगिरी एकाही फलंदाजाला करता आलेली नाही.

हिंदुस्थानचा विदेशी भूमीवरचा सर्वोच्च स्कोर

हिंदुस्थानने गेल्याच महिन्यात बांगलादेशविरुद्ध 6 बाद 297 हा आपला सर्वोच्च स्कोर केला होता. आज तो मागे टाकण्याची संधी होती, पण 14 धावा कमी पडल्या. मात्र विदेशी भूमीवरील विंडीजविरुद्धच्या 244 धावांना मागे टाकत 283 धावांचा नवा विक्रम रचला.

हिंदुस्थानची पहिली द्विशतकी भागी

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात संजू आणि तिलकने दुसऱ्या विकेटसाठी 210 धावांची विश्वविक्रमी भागी रचली. ही हिंदुस्थानची या फॉरमॅटमधील पहिली द्विशतकी भागीही ठरली. तसेच त्यांनी नेदरलॅण्ड्सच्या लेविट-एंजलब्रेट जोडीचा दुसऱ्या विकेटसाठीचा 193 धावांच्या भागीचा विश्वविक्रमही मोडीत काढला. 93 चेंडूंत केलेल्या 210 धावांच्या नाबाद भागीत संजूने 56 चेंडूंत 109 तर तिलकने 47 चेंडूंत 120 धावा केल्या.

एकाच डावात दोन शतकांचा विश्वविक्रम

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात कसोटी दर्जा असलेल्या आजवर एकाही संघाला एका डावात दोन शतके ठोकता आली नव्हती. तो पराक्रम संजू आणि तिलकने शतक ठोकत रचला. मात्र याआधी आयपीएलमध्ये 3, टी-20 क्रिकेटमध्ये 2 तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये झेक प्रजासत्ताक आणि जपानच्या फलंदाजांनी एका डावात दोन शतकांचा विक्रम केला आहे.

षटकारचौकारांचा वर्षाव

कसोटी दर्जा असलेल्या संघांपैकी एका डावात सर्वाधिक 22 षटकारांचा विश्वविक्रम अफगाणिस्तान, वेस्ट इंडीज आणि हिंदुस्थान या संघांच्या नावावर होता. आज तो विक्रम तिलक, संजू आणि अभिषेकने 23 षटकार ठोकत मोडीत काढला. तिलकने सर्वाधिक 10, संजूने 9 तर अभिषेकने 4 षटकार ठोकले. या डावात 17 चौकारांचाही वर्षाव झाला.