दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला टाकून महिलेने पळ काढल्याची घटना दहिसर येथे घडली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्या अर्भकावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दहिसरच्या रावळपाडा परिसरात एक शाळा आहे. गुरुवारी त्या शाळेजवळ एक नवजात अर्भक रस्त्याजवळ आढळून आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्या माहितीनंतर काहीच वेळात दहिसर पोलीस घटनास्थळी गेले. घटनास्थळी पोलिसांना दोन दिवसांचे पुरुष जातीचे अर्भक दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्या अर्भकाला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. त्या अर्भकावर उपचार सुरू आहेत. पालकत्व लपवण्याच्या हेतूने अज्ञात महिलेने त्या अर्भकाला रस्त्यावर टाकून पळ काढल्याचे समोर आले. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.