व्होटर स्लीप वाटण्यावरून भाजपच्या गुंडांचा धुडगूस

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विजयाची खात्री झाल्याने बिथरलेल्या भाजपाच्या गुंडांनी सिडकोत शुक्रवारी मतदानाच्या स्लिप वाटणाऱ्या शिवसैनिकांना मारहाण केली. पोलीस ठाण्यातही गोंधळ घातला. यामुळे तणाव निर्माण झाला होता.

नाशिक पश्चिममध्ये शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांना प्रचारात मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने त्यांच्या विजयाची खात्री आहे. मतदानाच्या चिठ्ठय़ा वाटपाचे काम सावतानगर भागात आज दुपारी सुरू होते. बिथरलेल्या भाजपाच्या गुंडांनी तेथे येवून शिवसैनिकांची अडवणूक केली, अर्वाच्च शिवीगाळ करीत मारहाण केली. स्लिप वाटपाचे काम बंद पाडले. यात एक शिवसैनिक जखमी झाला.

महाविकास आघाडीच्या एकीचे बळ आणि माझा विजय निश्चित असल्याने महायुतीचे धाबे दणाणले असून, सत्ताधाऱ्यांकडून दबाव आणला जात आहे. हे सहन केले जाणार नाही, असा इशारा बडगुजर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.