फडणवीसांनी ओळखायला हवं माझं स्थान काय आहे! खास पवार स्टाईल टोला

मी काही तेव्हा सत्तेत नव्हतो, तरीदेखील मी सांगितल्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, याचा अर्थ त्यांनी ओळखला पाहिजे माझं स्थान काय आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

महाराष्ट्रात 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांचे पत्र असल्याचा दावा फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीत केला आहे. त्यांचा हा दावा शरद पवार यांनी फेटाळून लावला. मी त्यांचा आभारी आहे, मी काही तेव्हा सत्तेत नव्हतो. माझ्याकडे काही संस्थेचं सदस्यत्व नाही. तरी मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते, याचा अर्थ त्यांनी राज्यातील राजकारणातील माझे स्थान काय आहे हे ओळखावे, असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे.

फडणवीसांनी काय केला दावा

2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेले पत्र हे महत्त्वाचे होते. हे पत्रच माझ्या कार्यालयात टाईप करण्यात आले होते. त्या पत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी शरद पवार यांनी काही बदलही सुचवले होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सरकार स्थापन करण्याबाबत शरद पवार यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली होती. यामध्ये आधी राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करू असे ठरले होते, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.