>> बबन लिहिणार
महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील अनेक भागांत अटीतटीच्या लढती पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक भागांत उमेदवारांकडून एका-एका मतासाठी फिल्डिंग लावली जात आहे. मुंबई-पुण्यात पोटापाण्यासाठी गेलेल्या गावाकडच्या मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी फोनाफोनी सुरू केली आहे. मुंबई-पुण्यातील मतदारांना सर्वपक्षीय उमेदवारांकडून फोन केले जात आहेत. हॅलो, तुम्हाला मतदानासाठी गावाला यायचं आहे. तुमच्या जाण्या-येण्याचा खर्च आम्ही करू. तुम्हाला ये-जा करण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगितले जात आहे. काही अडचण असेल तर फोरव्हिलर गाडी करून या, आम्ही गावात आल्यानंतर त्याचे पैसे देऊ, असेही काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील हजारो मतदार हे मुंबई आणि पुण्यात वास्तव्यास आहेत. ती मते मिळवण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न सुरू आहेत.
कार्यकर्त्यांवर जबाबदारी
मुंबई-पुण्यातील मतदारांना आणण्यासाठी कार्यकर्त्यांवर खासगी बसेसची व्यवस्थेची जबाबदारी टाकण्यात आली आहे. उमेदवारांनी प्रत्येक गावच्या मुंबईतील कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी सोपवली आहे. काही कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील मतदारांची यादी तपासून त्यांच्यासाठी बसेस बुक केल्या आहेत.
खासगी बसच्या भाडय़ात वाढ
मुंबई आणि पुण्याहून सुटणाऱया खासगी बसेसच्या भाडय़ात वाढ झाली आहे. मुंबईहून जालना-छत्रपती संभाजीनगरला जाणाऱया ट्रव्हल्सचे भाडे सरासरी 700 रुपये असते, परंतु निवडणुकीच्या काळात हे भाडे एक हजार ते 1200 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.