ठसा – पंडित राम नारायण

>>श्रीप्रसाद पदमाकर मालाडकर

सौरंगी किंवा सारंगी सम्राट पंडित राम नारायण यांचे पणजोबादेखील तत्कालीन सुप्रसिद्ध गायक होते. सारंगी वाद्यावर पंडित राम नारायण यांनी लहान वयातच प्रभुत्व मिळवले. पं. राम नारायण यांचे संगीताला समर्पित घराणे राजस्थानातील उदयपूरचे आहे. खापर पणजोबा, पणजोबा, आजोबा सारेच गायन-वादन रंगी रंगलेले. त्यांचे पिताश्री नाथुजी हे दिलरुबा वादक होते. घराण्यात सारंगी त्यांच्या आधी मात्र कुणीच वाजवली नव्हती. त्यांच्या घराण्याचे गुरू गंगागुरू यांनी त्यांच्या घरी ठेवलेली सारंगी पाचव्या वर्षीच पंडित राम नारायण यांना दिली. बालपणापासून सारंगी श्वास, ध्यास झाली. त्यांच्या स्वरावर शास्त्राrय संगीताचे संस्कार पंडित उदयलाल, पंडित माधव प्रसाद यांनी केले. 1943 मध्ये पंडित राम नारायण यांनी गुरूच्या इच्छेनुसार संगीताचे पुढचे शिक्षण घेण्यासाठी तत्कालीन भारतातल्या लाहोरला उस्ताद अब्दुल वहीद खान यांचे मार्गदर्शन घेतले. लाहोर आकाशवाणी केंद्रात गायक स्वर परीक्षेसाठी अर्ज केला. संगीत विभाग अधिकारी जीवनलाल मट्टू यांच्या लक्षात आले की, पंडित राम नारायण हे गायनासह सारंगी वादकसुद्धा आहेत. संगीत विभाग अधिकारी जीवनलाल मट्टू यांनी गायकऐवजी त्यांना सारंगी वादकपदावर घेऊन अब्दुसल वाहदी हुसेन यांना मार्गदर्शन करायला सांगितले. सन 1947 नंतर ते आकाशवाणी दिल्ली केंद्रात आले. अल्पावधीतच ते मुंबईत आले. त्यांनी चित्रपटसृष्टीत उमेदवारी केली. संगीतकार ओम प्रसाद (ओ. पी. नय्यर) यांचे ते लाडके वादक झाले. त्यांच्या अनेक गीतांना या सारंगीने बहार आणली. संगीतकार नौशादपासून आणि सर्वच संगीतकारांनी सारंगीचा चित्रपट संगीतात समावेश केला. ओम प्रसाद (ओ. पी. नय्यर) यांच्या संगीतात सारंगी वादनाला खास स्थान होते. सारंगी दुःखी पार्श्वभूमीप्रमाणेच आनंदी आणि प्रेमगीतात त्यांनी सादर केली. ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाना’, ‘मैं प्यार का राही हू’, ‘आज कोई प्यार से दिल की बाते कह गया’, ‘रातों को चोरी चोरी बोले मोरा कंगना’ या सुप्रसिद्ध चित्रगीतांत ओ. पी. नय्यर यांनी पं. राम नारायण यांच्या सारंगीचा समावेश केला आहे. त्यासह त्यांनी मुंबईत सारंगी वादनाचे स्वतंत्र कार्यक्रम सुरू केले. पंडितजींनी जिद्द सोडली नाही. काही काळ ते कुणा ना कुणाच्या साथीने कार्यक्रम करत राहिले. नंतर एकल कार्यक्रम सुरू केले. मग भारतासह जगभर तुफान लोकप्रियता मिळाली. त्या वेळच्या एच.एम.व्ही. कंपनीसाठी त्यांनी सारंगीच्या तीन ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केल्या. सतारवादक पं. रविशंकर यांच्यानंतर परदेशात भारतीय संगीत पं. राम नारायण यांनीच सादर केलेले आहे. अमेरिका, युरोप व अन्य देशांत कार्यक्रम करून सारंगी या वाद्याला जागतिक संगीतात स्थानापन्न करण्यासाठी निरंतर कार्यक्रम केले आहेत. पंडित राम नारायण यांनी देशातील आणि विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना सारंगी वादनाचे प्रशिक्षण दिले आहे. वाजवण्यास अतिशय अवघड, परंतु तरीही कानाला अतिशय गोड असणारे सारंगी हे सांगीतिकदृष्टय़ा अत्यंत समृद्ध भारतीय वाद्य आहे. ते केवळ आर्त वा करुण वाद्य नाही. उलट सारंगी म्हणजे ‘सौ रंगी’ असा अर्थ आहे. विविध सांगीतिक शक्यता, नव्या वाटांचे रंग खुलवणारी ती सारंगी आहे. त्यांच्या कलेचा सन्मान संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मविभूषण किताब, महाराष्ट्र राज्य सरकारचा पं. भीमसेन जोशी पुरस्कारही त्यांना प्रदान केला आहे. वाद्यावरचे अलौकिक प्रभुत्व, त्याला सर्जनशीलतेची साथ मिळाल्याने त्यांचे वादन अभिजात दर्जाचे आहे.

पंडित राम नारायण यांनी गुरू रूपात हा कुबेराचा संगीत वारसा पुढच्या पिढीला प्रदान केला आहे. देश-परदेशातल्या शिष्यासह त्यांची सुकन्या श्रीमती अरुणा नारायण कल्ले, सुपुत्र सुप्रसिद्ध सरोदवादक ब्रिज नारायण, सुप्रसिद्ध सारंगी वादक नातू हर्ष नारायण आहेत. तरल सूर, भक्ती, निरंतर साधना, तंत्रशुद्धपणा यांनी बहरलेली पंडितजी राम नारायण यांची अलौकिक तेजस्वी सारंगी न भूतो न भविष्यति. दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी देवाज्ञेने त्यांनी वयाच्या 97 व्या वर्षी स्वर्गीय देवदेवतांना मनमोहित करण्यासाठी पृथ्वी लोकातून स्वर्गलोकी प्रयाण केले. मात्र त्यांच्या सारंगीचे सूर अजरामरच आहेत.

(लेखक ज्येष्ठ प्रसिद्धी माध्यमतज्ञ आणि सल्लागार आहेत.)