वेब न्यूज – जगातील सर्वात महागडे निवासस्थान कोणते

सोशल मीडियावर अनेकदा राजकारणी व्यक्ती, अभिनेते- अभिनेत्री, खेळाडू आणि विविध सेलिब्रिटी आपल्या घरांचे फोटो शेअर करत असतात. सध्या अमेरिकेतील निवडणुकीच्या निमित्ताने अनेक लोक अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानाचे अर्थात व्हाईट हाऊसचे फोटो शेअर करत आहेत. यानिमित्ताने जगातील सर्वात महागडे घर कोणाचे अशी एक चर्चा मीडियामध्ये रंगलेली आहे. हिंदुस्थानचे प्रसिद्ध बिझनेसमन मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे निवासस्थान सर्वात महागडे असल्याचे अनेकांना वाटते, पण खरे तर जगातील सर्वात किमती निवासस्थान हे ब्रिटनच्या राजाचे अधिकृत निवासस्थान बकिंघम पॅलेस हे आहे. या महालाच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे जगातील महत्त्वाच्या महालांमध्येदेखील याचा समावेश होतो. या महालाची किंमत 40,180 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. 1,05,000 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या भव्य महालात 775 खोल्या, 188 कर्मचाऱयांसाठीच्या खोल्या आणि पाहुण्यांसाठी 52 आलिशान रॉयल गेस्ट रूम आहेत. त्यानंतर नंबर लागतो तो 15 हजार करोड रुपये किमतीच्या अँटिलिया या मुकेश अंबानींच्या घराचा. मुंबईमध्ये असलेल्या या घरात जगातील सर्व आधुनिक सुखसोयी उपलब्ध आहेत. या 27 मजली इमारतीत 6 बेसमेंट, 3 हॅलिपॅड, बॉलरूम, स्विमिंग पूल, स्पा अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. फ्रान्समध्ये वसलेला व्हिला लियोपोल्डादेखील या क्रमवारीत येतो. 18 एकरांत पसरलेल्या या घराची अंदाजे किंमत सहा हजार करोड रुपये आहे. 50 खोल्या असलेल्या या घरात टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल व या जोडीला एक भव्य अशी बागदेखील आहे. फ्रान्समध्येच असलेला व्हिला लेसस सेड्रेस हा 5500 करोड रुपयांचा व्हिला या यादीत चौथ्या नंबरवर आहे. हा व्हिला 14 एकर इतक्या मोठय़ा जमिनीवर बांधलेला आहे. या व्हिलात 14 बेडरूमदेखील आहेत.