उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. यातच एका सभेला संबोधित करताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ”मुख्यमंत्री कपड्याने योगी आहेत, विचारांनी नाही.”
यूपीतील करहल येथील सभेत अखिलेश यादव म्हणाले की, ते केवळ कपड्याने योगी आहेत, विचारांनी नाही. करहलची जनता ऐतिहासिक निकाल देणार आहे. यावेळी करहल पोटनिवडणुकीत विजयाचा विक्रम करणार आहे. याआधीही तुम्ही समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला चांगल्या मतांनी विजयी केले होते. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती होईल. समाजवादी पक्षाला विजयी करण्यासाठी येथील संपूर्ण जनता सज्ज झाली आहे.”
ते म्हणाले की, या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. जे पीडीएची माहिती विविध ठिकाणी देत आहेत त्यांनी किमान डीएपीचीही माहिती द्यावी. पूर्वी भाजपचे लोक फक्त पोत्यातून चोरी करत होते, आता संपूर्ण पोत्याची चोरी करत आहेत. करहल आपला विजय होणार नाही हे सरकारच्या लोकांनी आधीच मान्य केले आहे. हा समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडीचा विजय असणार आहे.
अखिलेश यादव पुढे म्हणाले की, ”हे सरकारी नोकऱ्या देणार नाही, नोकऱ्या देणे या सरकारच्या अजेंड्यात नाही. त्यामुळे कुठलीही सरकारी नोकरी आली की त्याचा पेपर फुटतो. अलीकडे, जेव्हा भरती झाली तेव्हा 30 टक्के तरुण केंद्रापर्यंत पोहोचू शकले नाहीत.”