अमेरिकेत दरवर्षी किती लोकांना मिळतं ग्रीन कार्ड? यात हिंदुस्थानी नागरिकांची किती आहे संख्या? जाणून घ्या

अनेक हिंदुस्थानी नागरिक अमेरिकेत जाऊन स्थायिक होतात. तर जगभरातून अनेक लोक अमेरिकेत जाऊन राहतात.  अशा लोकांसाठी अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळणे हे स्वप्नापेक्षा कमी नाही.  हा कायमस्वरूपी निवासी दस्तऐवज आहे, जो धारकाला यूएसमध्ये राहण्याची आणि काम करण्याची परवानगी देतो.  पण प्रश्न असा आहे की, दरवर्षी किती जणांना ग्रीन कार्ड मिळते? आणि यात हिंदुस्थानी नागरिकांची संख्या किती आहे? याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

ग्रीन कार्ड म्हणजे काय?

ग्रीन कार्ड हे अमेरिकन सरकारने जारी केलेले अधिकृत दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज धारकाला अमेरिकेतील कायमस्वरूपी निवासी दर्जा देतो. ग्रीन कार्डधारकांना राहण्याची, काम करण्याची, त्यांच्या मुलांना शाळेत जाण्याची आणि कुटुंबातील सदस्यांना अमेरिकेत आणण्याची परवानगी असते.

दरवर्षी किती लोकांना अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळते?

ग्रीन कार्डला युनायटेड स्टेट्स पर्मनंट रेसिडेंट कार्ड म्हणतात. अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्यासाठी ग्रीन कार्ड ही मूलभूत पायरी आहे. अमेरिकेत दरवर्षी 10 लाख लोकांना ग्रीन कार्ड दिले जाते.

ग्रीन कार्डसाठी अर्ज कसा करावा?

ग्रीन कार्डसाठी अनेक प्रकारे अर्ज करता येतो.  उदाहरणार्थ, जर तुमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी कोणीही अमेरिकन नागरिक किंवा कायम रहिवासी असेल तर तुम्ही त्यांच्यामार्फत ग्रीन कार्डसाठी अर्ज करू शकता.  याशिवाय कोणत्याही अमेरिकन कंपनीला तुमच्या सेवेची गरज असल्यास ती तुमच्यासाठी ग्रीन कार्डसाठी अर्ज करू शकते.  तसेच, दरवर्षी यूएस सरकार ग्रीन कार्ड लॉटरी आयोजित करते, ज्यामध्ये जगभरातील लोक सहभागी होऊ शकतात आणि जर तुम्ही दुसऱ्या देशात छळ किंवा हिंसाचाराला बळी पडला असाल तर तुम्ही अमेरिकेत निर्वासित किंवा राजकीय आश्रयासाठी अर्ज करू शकता.

दरम्यान, रोजगार-आधारित ग्रीन कार्ड जारी करण्याची वार्षिक मर्यादा 1,40,000 आहे.  याशिवाय प्रत्येक देशासाठी 7 टक्के कोटाही आहे. याअंतर्गतच हिंदुस्थानमधील नागरिकांना ग्रीन कार्ड दिलं जातं.