भाजप नेते, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी कर्जत – जामखेड मतदारसंघात सभा पार पडली. या सभेत विरोधकांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत खालच्या दर्जाचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा महाविकास आघाडीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे उमेदवार रोहित पवार यांनी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांनी अकलेचे तारे तोडत भाजपचा खरा चेहरा दाखवल्याचा सणसणीत टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
महायुतीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर भाषण पार पडले. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी, “काही झालं की आम्हीच केलं, ते घडलं तर माझ्यामुळे घडलं, त्याच्याकडे पोरगा झाला तर माझ्यामुळे झाला.” अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते.
काल माझ्या मतदारसंघात दोन-तीन विकृत लोकांनी अकलेचे तारे तोडत महिलांविषयी अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्ये केली आणि आज तसेच अकलेचे तारे तोडत देवेंद्र फडणवीस साहेबांनीही भाजपचा खरा चेहरा दाखवला. फडणवीस साहेब आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण आता महाराष्ट्र अशा प्रवृत्तींना… https://t.co/6y2nH3Emiw pic.twitter.com/5SGavkK3VP
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 15, 2024
रोहित पवार यांनी एक्स अकाउंटवर ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समचार घेतला. ते म्हणाले की, काल माझ्या मतदारसंघात दोन-तीन विकृत लोकांनी अकलेचे तारे तोडत महिलांविषयी अत्यंत खालच्या पातळीची वक्तव्ये केली आणि आज तसेच अकलेचे तारे तोडत देवेंद्र फडणवीस साहेबांनीही भाजपचा खरा चेहरा दाखवला. फडणवीस साहेब आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण आता महाराष्ट्र अशा प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.