रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी बोट रॅली

येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होवून मच्छिमारांनी मतदान करावे. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी दूत म्हणून काम करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात विशेषत: मच्छिमार व्यावसायिकांमध्ये मतदार जनजागृतीसाठी आज मिरकरवाडा बंदरावर बोट रॅली काढण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, तहसिलदार राजाराम म्हात्रे, मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त आनंद पालव आदींसह मच्छिमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी सदस्य, व्यावसायिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पोलीस अधिक्षक कुलकर्णी म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार जनजागृती हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. आपल्या भागाचा विकास कोणी करावा, त्या लोकप्रतिनिधीला ठरविण्याचा अधिकार आपले मतदान आहे. लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होण्यासाठी निवडणूक आयोग जनजागृती करण्यावर भर देत आहे. आपल्या जिल्ह्याला २३७ कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. याच समुद्रकिनाऱ्यावरती मच्छिमार बांधवांचा व्यवसाय चालतो. मासेमारीसाठी ते समुद्रामध्ये जात असतात.

२० नोव्हेंबर हा दिवस मतदानासाठी वेगळा काढून ठेवा. या दिवशी मासेमारी बंद असणार आहे. सर्व मच्छिमारांपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे. सर्वांनी या दिवशी आवर्जून मतदान करावे. देशाची सुरक्षितता हाही एक महत्वाचा भाग आहे. समुद्रामध्ये काही संशयास्पद हालचाल असेल. गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक असतील तर त्याची माहितीही पोलीसांना दिली पाहिजे म्हणजे त्यांच्यावर कारवाई करता येईल, असेही ते म्हणाले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड म्हणाले, मतदान हा आपला मुलभूत अधिकार आहे. मतदान करुन लोकशाही बळकट करण्यासाठी आपला खारीचा वाटा असतो. मतदार माहिती चिठ्ठी वाटप करण्यात येत आहे. जनतेचा आवाज म्हणून लोकप्रतिनिधी असतात त्यांना निवडण्याचा अधिकार मतदानामधून मिळालेला आहे. आपण आपला प्रतिनिधीच निवडला नाही, तर तक्रार करायला जागा राहणार नाही. लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करुन खारीचा वाटा उचलावा. कुटूंबातील सदस्यांसह स्वत: निष्पक्षपणे मतदान करुन आपले कर्तव्य पार पाडावे.

निवडणूक निर्णय अधिकारी देसाई म्हणाले, २६६ रत्नागिरी विधानसभा मतदार संघाला स्वच्छ आणि समुद्रकिनाऱ्याचे वरदान लाभले आहे. हजारो मच्छिमार बांधव मासेमारीमध्ये गुंतले आहेत. एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही त्यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर पाणी, आरोग्य, व्हील चेअर, स्वयंसेवक, मंडप, मदतनीस यांची सुविधा करण्यात येत आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदार माहिती चिठ्ठी वाटप देखील करण्यात येत आहे. पात्र मतदारांनी अधिकाधिक मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. उपस्थितांनी स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ करुन जनजागृती केली. तसेच सेल्फी पॉईंटवर छायाचित्रे काढली.

यानंतर सुमारे १५० बोटींच्या सहभागाने समुद्रामधून बोट रॅली काढण्यात आली. शाहीर राजेश गोसावी, विष्णू पवार आणि जनार्दन मोहिते यांच्या पथकाने पोवाडा शाहीरीमधून उपस्थितांची जनजागृती केली.