लोअर परळ परिसरातील कमला मिल कंपाऊंडमधील जेएफए फर्म आणि जेएसए कार्यालयाजवळ बॉम्ब ठेवल्याच्या फोनने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने फोन करून बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. फोननंतर तात्काळ परिसरात झडती घेण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
आयएएनएस वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा मेलही प्राप्त झाला होता. JFA कायदा फर्म आणि JSA कार्यालयाला फरझान अहमद या व्यक्तीच्या कंपनीच्या ईमेल पत्त्यावरून धमकीचा ईमेल प्राप्त झाला. जेएफए फर्मचे कार्यालय आणि बल्लार इस्टेट कार्यालयात स्फोटके ठेवल्याचा दावा या ईमेलमध्ये करण्यात आला आहे.
धमकीचा ईमेल आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून गुन्ह्याची तक्रार नोंदवली. मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत सर्वत्र झडती घेतली. मात्र काहीच संशयास्पद आढळले नाही.