मिंधेंना 50 खोक्यांचा भाव मिळतो; मग शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापसाला का नाही? उद्धव ठाकरे यांनी गद्दारांवर आसूड ओढला

मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र जिथे जातोय तिथे सगळ्यांची एकच ओरड आहे की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. मिंधे, गद्दारांना 50 खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्काचे का मिळू नये? असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारांवर आसूड ओढला.

सिल्लोड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सिल्लोडमध्ये दणदणीत सभा झाली. यावेळी त्यांनी गद्दार आमदार अब्दुल सत्तारसह मिंधे, भाजप आणि मोदी-शहांना झोडपून काढले.

महाविकास आघाडीचे सरकार असताना सोयाबीनला 7 हजार रुपये भाव होता. आता 4-5 हजार रुपये भाव मिळत असून सरकार आल्यावर 7 हजार रुपये भाव दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाही तर गद्दाराला हमीभाव द्यायचा का? गद्दाराला 50 खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना हक्काचे का मिळू नये? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

तुम्ही ज्याला निवडून दिला तो गद्दार झाला. खोके घेऊन पळाला. ज्यांनी निवडून दिले ते त्यांच्याकडे गेल्यावर तो उलटा फिरून दादागिरी करतो. त्या गद्दाराला पाडा. असा गाडा की त्याची चौकशी करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक तुमचे आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचे भविष्य ठरवणारी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

अनेक जण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात. काल मुंबईतही गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला. खुर्च्यांचीच गर्दी खुप जमली, माणसंच नाही आली. पण आपल्याकडे सगळी जीवाभावाची माणसं असून इकडे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. सिल्लोडमधील हुकुमशाही, दडपशाही, गुंडागर्दी गाडून, जाळून टाकायला आलेली ही गर्दी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

– वेळ मिळेल तसा टीव्ही चॅनल आणि पत्रकारांना मुलाखती देतोय. त्यांनी मला प्रश्न विचारले की मिंधे असे बोलतात तसे बोलतात. म्हटले मिंध्यांच्या चिंध्या होणार आहेत.
– सिल्लोडमध्ये जो गद्दार आहे त्याने टीव्हीसमोर सुप्रियाताईला शिवीगाळ केली आणि हाच माणूस पंतप्रधान छत्रपती संभाजीनगरला आले तेव्हा त्यांच्या व्यासपीठावर होता. मोदीजी हेच तुमचे हिंदुत्व आहे का? हीच तुमची संस्कृती आहे का?
– सर्वसामान्य माणसं एकवटतात तेव्हा कितीही मोठा माणूस असलला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही, हा देशाचा इतिहास आहे.
– गद्दाराला पाडा, असा गाडा की त्याची चौकशी पूर्ण करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही.
– मी तुम्हाला सोयाबीनला भान देऊन दाखवणार.
– सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्त केले होते, यांनी गद्दारी करून सरकार पाडले नसते तर पुन्हा कर्जमुक्त केले असते.
– मी म्हणजे मिंधे नाही. अडीच वर्षामध्ये यांना कधी बहीण आठवली नाही. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण… लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देतात. 1500 रुपये मिंधे त्यांच्या वडिलांच्या खिशातले नाही देत. हे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत.
– 1500 काय देता, आम्ही 3000 देणार आहोत. त्याच बरोबरीने महिलांच्या रक्षणासाठी खास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्ग महिला असणारी पोलीस स्थानकंही बांधणार आहोत.
– तेल, तांदुळ, गहू, साखर आणि डाळ या पाच जीवनाश्यक वस्तुंचे भाव शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही नुकसान होऊ न देता 5 वर्ष स्थिर ठेऊन दाखवणार आहे.
– आपण गद्दार नाही. आपल्याकडे पैशाचा महापूर नाही. त्यांच्याकडे पैशाची धनशक्ती आहे, माझ्याकडे जीवाभावाची धनशक्ती आहे.
– ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलालाही मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही.
– अमित शहा मेहबुबा मुफ्तीबरोबर सत्तेत बसले. तेव्हा कुठे गेलो होते राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व
– 370 कलम काढले हे काश्मीरसाठी महत्त्वाचे आहे. आजही मी त्याचे कौतुक करतो. कश्मीर देशाचा अविभाज्य भाग आहे. पण कश्मीरमध्ये आपल्याच रक्ताच्या जनतेवर अन्याय होत होता तेव्हा मोदी, शहा तुम्ही कुठे होतात?