भाजपने आम्हाला देशभक्ती शिकवू नये, मल्लिकार्जुन खरगे यांची भाजपवर टीका

देशाला स्वातंत्र्य मिळविण्यात आणि एकात्मता टिकवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी बलिदान दिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना जाळणारे, तिरंग्यावरील अशोक चक्राला विरोध करणारे आणि तिरंगा ध्वज स्वीकारण्यास नकार देणाऱ्या भाजपने आम्हाला देशभक्ती शिकवू नये, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर केली.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खरगे पुण्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खरगे म्हणाले, ‘प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख, दरवर्षी दोन कोटी रोजगार, बुलेट ट्रेन, दहशतवाद संपविणार यांसारख्या अनेक गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या. परंतु त्या पूर्ण झाल्या का, ही कसली गॅरंटी,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मनरेगा, अन्न सुरक्षा, शिक्षण हक्क कायदा, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी अशा अनेक योजनांची काँग्रेसने गॅरंटी दिली. ती पूर्णदेखील केली. महाविकास आघाडीने महाराष्ट्राच्या विकासासाठी जी पंचसूत्री जाहीर केली आहे, तिची अंमलबजावणी कशी करायची, याचे डोके आमच्याकडे आहे आणि ते राबविणार ही गॅरंटीदेखील असल्याचे खरगे यांनी सांगितले.