ठाण्याच्या नव्या डीपीत कोकणीपाड्यावर कुऱ्हाड, विकासाच्या नावाखाली विनाशाचे कटकारस्थान

शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासींना उद्ध्वस्त करण्याचा डाव मिंध्यांच्या ‘प्रतापी’ आमदाराने आखला आहे. ठाण्याच्या नव्या डीपी प्लॅनमध्ये कोकणीपाड्यावर कुऱ्हाड चालवून विकासाच्या नावाखाली विनाशाचे कटकारस्थान रचले जात आहे. दरम्यान स्थानिक आदिवासींनी महापालिका प्रशासन आणि स्थानिक आमदाराच्या विरोधात संताप व्यक्त केला असून आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या विकास आराखड्यात (डीपी प्लॅन) कोकणीपाड्यातील जनतेवर अन्याय करण्यात आला आहे. हा डीपी म्हणजे विकास नव्हे तर कोकणीपाड्याच्या अस्तित्वावर चाललेला हल्ला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

नव्या आराखड्यानुसार 40 मीटर रुंद रस्त्याने वस्ती बाधित होणार आहे आणि त्यातच कोकणीपाड्यात उद्यान आरक्षण तसेच गावकऱ्यांना विश्वासात न घेता क्लस्टर योजना घुसवण्यात आली असल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे. 15 वर्षांत विकासाच्या नावाखाली विनाशच बघितलेल्या कोकणीपाडावासीयांनी आता या चुकीला विरोध करायची वेळ आली असल्याची जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे.

मशालीला मतदान करण्याचा निर्धार

कोकणीपाड्यातील पारंपरिक वस्तीवर येणाऱ्या या संकटामुळे गावकऱ्यांत प्रचंड रोष आणि आक्रोश आहे. त्यांच्या मते हा डीपी प्लॅन म्हणजे त्यांच्या भूमीवरील हक्क ओरबाडण्याचा प्रयत्न आहे. आता खोट्या विकासाच्या खेळाला थारा नको. कोकणीपाड्याला न्याय मिळवून देण्यासाठी मशाल चिन्हावर मतदान करा, असा निर्धार गावातील नागरिकांनी केला आहे.

कोकणीपाडावासीय आता शांत बसणार नाहीत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदानातून ते अन्यायाचा वरवंटा फिरवणाऱ्यांना धडा शिकवतील. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार नरेश मणेरा यांनी आम्हाला विश्वास दिल्याने त्यांना पाठिंबा देणार, असे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते हेमंत महाले यांनी सांगितले.