विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या. या सभेत त्यांनी केवळ शहर विकासाच्या थापा मारून खोट्या घोषणांचा पाऊस पाडला, असा घणाघात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, मागील वर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून अमृतमहोत्सवी वर्षाच्या समारोपप्रसंगी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठवाडा विकासासाठी 46 हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली.
मराठवाडा वॉटरग्रीड आणणार, असे घोषित करण्यात आले. मात्र दीड वर्षात एका रुपयाचा निधीही उपलब्ध करून दिला नाही. मनपाच्या माध्यमातून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना महाविकास आघाडीच्या काळात मंजूर करण्यात आली. 1680 कोटी रुपयांच्या या योजनेचा शुभारंभ उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना करण्यात आला. योजनेसाठी मनपाचा हिस्सा मनपा भरू शकत नसल्याने आपण राज्य शासनामार्फत देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र नंतरच्या अडीच वर्षात या योजनेचे काम रेंगाळले आहे. याला राज्य सरकार पूर्णतः जबाबदार आहे, अशी टीका दानवे यांनी केली.
7 हजार 274 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मिंधे आणि भाजप सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात मराठवाड्यातील 7 हजार 274 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. ना पीकविमा, ना नुकसान भरपाईचे अनुदान मिळाले. नाही. त्यामुळेच त्यांनी टोकाची भूमिका घेतली. भाजप-मिंधे गटाचे 1812 पदाधिकारी शिवसेनेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यातील भाजप आणि मिंधे गटाला कंटाळून 1812 पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, असे दानवे यांनी सांगितले.