लांब पल्ल्याच्या मेल गाडय़ांमध्ये संधी साधून प्रवाशांच्या किमती ऐवज ठेवलेल्या बॅगा चोरून नेणाऱया एका सराईत चोराच्या रेल्वे गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. सुरत ते मुंबई सेंट्रल या मेलमध्ये चोरी करून तो यूपीतल्या प्रयागराजमध्ये जाऊन लपला होता. तेथे जाऊन त्याला पकडून आणले.
एक प्रवाशी सुरत ते मुंबई सेंट्रल असा प्रवास करत असताना ते झोपले असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोराने त्यांची बॅग लांबवली होती. प्रवाशाला जाग आल्यानंतर बॅग नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक विजय खेडेकर, निरीक्षक रोहित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणाऱया पथकाने सीसीटीव्ही तपासले असता नेरूळ युनीटला एक रेकॉर्डवरचा संशयीत आरोपी आढळून आला. त्या आरोपींचा माग काढला असता तो यूपीच्या प्रयागराज येथे गेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने प्रयागराज गाठून राम सुंदर अग्रहरी (45) याला उचलून आणले. चौकशीत त्याने गुह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार लाख किमतीची सोन्याची लगड आणि 27 हजार किमतीचा डायमंड हस्तगत करण्यात आला.