केवायसीशिवाय विकले 30 हजार सिमकार्ड, सायबर पोलिसांनी आठ जणांना केली अटक

जास्त इन्सेन्टिव्ह आणि टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात ग्राहकाचे दोन वेळेस बायोमेट्रिक करून एक कार्ड ग्राहकांना तर दुसरे कार्ड सायबर ठगांना देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मध्य सायबर पोलिसांनी आठ जणांना अटक केली. महेश कदम, रोहित यादव, सागर ठाकूर, राज आर्डे, गुलाब जैस्वार, महेश पवार अशी खासगी टेलिकॉम सेवा पुरवणाऱया पंपनीचे प्रतिनिधी आहेत, तर उस्मानअली शेख आणि अबूबकर हे दुकानमालक आहेत. त्या दोघांनी कुलाबा परिसरात आतापर्यंत काही परदेशी नागरिकांना विना केवायसी सिमकार्ड दिल्याचे तपासात समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी मध्य सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद होता. सायबरचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. प्रभारी निरीक्षक मोसमी पाटील, उपनिरीक्षक आकांशा नलावडे, वेताळे, बावडेकर, गदगे आदीच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना एका व्हॉटस्अॅप ग्रुपची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तपास करून आठजणांना अटक केली. महेश, रोहित, सागर, राजने गुलाबला व्हॉट्सअॅप ग्रुपमधील असलेले व फसवणुकीसाठी वापरलेले नंबर हे पोर्ट करून दिले होते. यूपीसी कोडचा वापर करून ते पश्चिम बंगाल ते मुंबई असे नंबर पोर्ट केल्याचे समोर आले आहे. महेश, रोहित, सागर, राजने हॅण्डलूम एम्पोरियम एका टेलिकॉम कंपनीचे डीएसईचे कर्मचारी आहे तर महेश पवार हा त्याचा म्होरक्या होता.

अशी करायचे हातचलाखी

राज, महेश, रोहित आणि सागर हे जे ग्राहक सिमकार्ड घेण्यासाठी यायचे. त्याचे दोन वेळेस बायोमेट्रिक करत असायचे. बायोमेट्रिक करून त्याचे केवायसीसाठी कागदपत्रे घेत असायचे. त्यावर ते दोन सिमकार्ड घ्यायचे. एक कार्ड ग्राहकांना तर दुसरे कार्ड हे विना परवाना ऑक्टिव्ह करून ते सायबर ठगांना देत असायचे.

कमिशनच्या नादात विक्री केले सिमकार्ड

महेश, रोहित, सागर, राजने उस्मान आणि अबूबकरच्या दुकानात विक्रीसाठी काही कार्ड दिले होते. ते कार्ड बेकायदेशीररीत्या प्राप्त करून ऑक्टिव्हेट केले. त्या सिमकार्डच्या मोबदल्यात त्याना कमिशन मिळत होते.