निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर ‘ईडी’ अॅक्शन मोडवर आली आहे. या पेंद्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 24 ठिकाणी छापे टाकले. मालेगावातील व्यावसायिकाच्या विविध बँक खात्यांतून 125 कोटी रुपयांची रक्कम निवडणूक गैरप्रकारांसाठी वापरल्याचा संशय आहे. ही छापेमारी ईडीने निवडणूक धामधुमीत केलेली सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
मालेगावचा व्यावसायिक सिराज अहमद हारूणने निवडणूक गैरप्रकारांसाठी बँक खाती आणि 125 कोटी रुपयांचा वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल करून ईडीने गुरुवारी दिवसभरात ठाणे, वाशी, मालेगाव, नाशिक, अहमदाबाद, सुरत आदी 24 ठिकाणांची झडती घेतली. अफरातफर करून मिळवलेल्या पैशांचा निवडणूक गैरप्रकारांसाठी वापर केल्याच्या संशयातून ईडी अधिक तपास करीत आहे.
गुजरातसह 7 राज्यांतील व्यवहारांची चौकशी
छापेमारीत महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा, ओडिसा व पश्चिम बंगालमधील अडीच हजारांहून अधिक व्यवहार तसेच सुमारे 170 बँक शाखांची चौकशी केली जात आहे.
नेमके प्रकरण काय?
चहा व कोल्ड्रिंक एजन्सी चालवणाऱया सिराज अहमद हारूनने बँक खाती उघडण्यासाठी डझनभर लोकांच्या केवायसीचा तपशील घेतला. मक्याचा व्यवसाय करायचा असल्याचे सांगून शेतकऱयांकडून पैसे घेतले. मित्रांकडून केवायसी कागदपत्रे घेऊन आणखी दोन खाती उघडली. ही 14 बँक खाती सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान उघडली.