महाराष्ट्राला गुजराष्ट्र, अदानीराष्ट्र करण्याचा भाजपचा डाव; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले. पण त्यात यश आले नाही म्हणून त्यांनी आता मुंबई अदानीच्या घशात फुकटात घालण्याचा डाव आखला आहे. तुमच्या, आमच्या हक्काची मुंबईतील 1 हजार 80 एकर जमीन अदानीला आंदण दिली आहे. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवून इथल्या तरुणांना बेरोजगार केले जात आहे. महाराष्ट्राचे नाव गुजराष्ट्र किंवा अदानीराष्ट्र करण्याचा डाव असून महाराष्ट्राला कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या भाजप-मिंधेंच्या खोके सरकारला हद्दपार करा आणि महाराष्ट्राच्या अभिमानाची, स्वाभिमानाची मशाल पेटवा, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

कर्जत-खालापूरचे शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत तसेच उरण-पनवेलचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या कर्जत व मोहोपाडय़ात दोन दणदणीत सभा झाल्या. त्याआधी दापोली येथे संजय कदम यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडली. यावेळी त्यांनी मिंधे-भाजप आणि अजित पवार गटाच्या ‘महाझुटी’ सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी उपनेते सचिन अहिर, महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत, मनोहर भोईर, काँग्रेसचे श्रीरंग बर्गे, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्रृती म्हात्रे, लाल ब्रिगेड संघटनेचे राजेंद्र पाटील, आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, मिलिंद पाडगावकर, अकलाख शिलोत्री, उल्हासराव देशमुख, रिचर्ड जॉन, कम्युनिस्ट पक्षाचे ऍड. गोपाळ शेळके, शिवसेना खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, शिवसेना महिला आघाडीच्या सुवर्णा जोशी, रेखा ठाकरे, अनिता पाटील, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे, शकील कुरेशी उपस्थित होते.

रोजगार मिळाला तो 40 चोर आणि गद्दारांना

देशातील प्रत्येक राज्याची प्रगती व्हायला हवी. प्रत्येक राज्य प्रगती करेल तेव्हा देश प्रगती करेल. पण ‘महाझुटी’ सरकार महाराष्ट्राचे उद्योगधंदे ओरबाडून गुजरातला का देत आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणलेली कोटय़वधींची गुंतवणूक, उद्योगधंदे आणि महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा रोजगार गुजरातला ओढून नेला. 40 चोर आणि गद्दारांना मात्र चांगलाच रोजगार मिळाला, असा घणाघातही त्यांनी केला.

50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार

अनेक समाज आरक्षण मागताहेत. त्यांची मागणी योग्यच आहे. पण भाजप-मिंध्यांनी शिवरायांची शपथ घेऊन सगळ्या समाजाला फसवले आहे, आपापसात लढवत ठेवले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करणार आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार, असे वचनच आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

मनसे गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढतेय

मनसेचं तर सगळं वेगळंच चाललंय. ते महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी नव्हे तर ते गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढताहेत. कारण भाजपला मत म्हणजे मोदींना मत आणि मोदी तर महाराष्ट्रातील सगळे उद्योग ओरबाडून गुजरातला नेत आहेत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

स्वाभिमान गहाण टाकणाऱ्यांना धडा शिकवा

भाजपला केवळ फोडाफोडीत रस आहे. महाराष्ट्राच्या हिताचे त्यांना काहीही देणे-घेणे नाही. त्यामुळे परिवर्तन घडवायचे असेल तर विखुरले जाऊ नका. स्वाभिमान गहाण ठेवून दिल्लीसमोर झुकणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

आताच्या उद्योगमंत्र्यांचे डांबर उद्योग

आपले सरकार असताना विविध प्रकल्प आणण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण प्रकल्प आणत होतो. तेव्हाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे काम जगासमोर होते. नाही तर आताचे उद्योगमंत्री, त्यांचा डांबर सोडून काय उद्योग आहे हे कुणाला माहीत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

 हे तुमचे लाडके भाऊ आहेत का?

मिंधे सरकारमधील अब्दुल सत्तार, संजय राठोडसारखे मंत्री तुमचे लाडके भाऊ आहेत का? अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंना काय म्हणाले होते हे आम्ही पाहिलंय. महिलांचा अपमान करणारे तुमचे लाडके भाऊ आहेत का? गौरी लंकेचा खून करणाऱ्याला त्यांनी पक्षात घेतले. ते तुमचे लाडके भाऊ आहेत का? बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांना त्यांनी पक्षात घेतले. ते तुमचे लाडके भाऊ आहेत का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

अलका कुबलपेक्षा रामदास कदम जास्त रडतील

23 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा अलका कुबल जेवढी रडली नसेल तेवढे रामदास कदम रडतील. या गद्दारांचा हिशेब आपल्याला चुकता करायचा आहे. ही दहशत संपवायची आहे, असे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम म्हणाले.

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई ः भास्कर जाधव

ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. तुमची सर्वांची जनशक्ती ही धनशक्तीला पराभूत करेल. रामदास कदम विकास केला सांगतात. जरा खेड-दापोली रस्त्यावरून जाऊन बघा. मग कळेल की काय विकास झालाय, असा टोला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी लगावला.