प्रयागराजमध्ये परीक्षार्थींचा विजय; योगी सरकारकडून मागण्या मान्य

प्रयागराजमधील यूपीपीएससी अर्थात उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करणाऱया तब्बल 10 हजार आंदोलक परीक्षार्थींचा विजय झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या योगी सरकारने मान्य केल्या असून दोन शिफ्ट आणि दोन परीक्षांचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. लोकसेवा आयोगाचे सचिव अशोक कुमार यांनी याबाबतची घोषणा केली.

आज सकाळी आंदोलक परिक्षार्थी आणि पोलिसांमध्ये अक्षरशः हाणामारी झाली. आंदोलकांना बळजबरीने उटलण्यासाठी साध्या गणवेशातील पोलिस आल्याचा आरोप परिक्षार्थींनी केला. पोलिसांना पाहताच सर्वजण एकमेकांच्या अंगावर आडवे झाले. पोलिसांनी परिक्षार्थी विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईमुळे परीक्षार्थी संतप्त झाले. त्यानंतर सुमारे तासभरात 10 हजारांहून अधिक विद्यार्थी आयोगाजवळ पोहोचले. पोलिसांनी बॅरिकेडिंग करून आयोगाच्या कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद केला होता. मात्र, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले. विद्यार्थी आयोगाच्या गेटवर पोहोचले. परीक्षार्थींचा रुद्रावतार पाहून पोलीस बॅकफूटवर गेले. पोलिसांनी आयोगाच्या इमारतीला चारही बाजूंनी घेराव घालून तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
सरकारचे वर्तन असंवेदनशील आणि दुर्दैवी- राहुल गांधी

प्रयागराजमध्ये परीक्षार्थींसोबत उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचे वर्तन अत्यंत असंवेदनशील आणि दुर्दैवी आहे, अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवरून केली आहे. नॉर्मलाइजेशनच्या नावावर पारदर्शी नसलेली व्यवस्था स्वीकारता येणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या न्याय्य आहेत. शिक्षण व्यवस्थाच उद्ध्वस्त करण्यात गुंतलेल्या भाजपा सरकारच्या अकार्यक्षमतेची किंमत विद्यार्थ्यांनी का मोजायची असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.