>>शिल्पा सुर्वे
मुंबईच्या टोकाला असणारा कुलाबा मतदारसंघ हा हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. एकीकडे उंच इमारती, कॉर्पोरेट कार्यालये तर दुसरीकडे कोळीवाडे आणि झोपडपट्टय़ा आहेत. मागील गेली दोन टर्म हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. मात्र येथील भूमिपुत्रांच्या समस्या जैसे थे आहेत.
यंदा कुलाबा मतदारसंघात मुख्य लढत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार हिरा देवासी आणि भाजपाचे विद्यमान आमदार राहुल नार्वेकर यांच्यात आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत. कुलाब्यातून 2004 मध्ये काँग्रेसच्या अॅनी शेखर निवडून आल्या होत्या. मतदारसंघ पुनर्रचनेनंतरही 2009 साली अॅनी शेखर विजयी झाल्या होत्या. यंदा भाजपाने राहुल नार्वेकर यांना तिकीट कायम ठेवले. त्यामुळे माजी आमदार राज पुरोहित नाराज झाले. राज पुरोहित यांनी बंडाचा पवित्रा घेतला. मात्र भाजपा नेतृत्वाने त्यांची समजूत काढल्यावर त्यांचे बंड थंड झाले.
समस्या जैसे थे
n कोळीवाडय़ाचे प्रश्न सुटलेले नाहीत. झोपडपट्टी पुनर्विकासाचे भिजत घोंगडे आहे. जुन्या चाळी, मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न मोठा आहे.
n परिसरात अनेक कार्यालये आहेत. अरुंद गल्ल्या असल्यामुळे वाहने उभी करण्यास जागा नाही. पार्किंगची समस्या मोठी आहे. वाहतूक कोंडी नेहमी असते.
n पाणीकपात, कमी दाबाने पाणीपुरवठा यामुळे नागरिक हैराण आहेत.
संमिश्र लोकवस्ती
मतदारसंघात उच्चभ्रू आणि कनिष्ठ लोकांची वस्ती आहे. उद्योजक व्यापारी वस्ती असलेला कुलाबा, पर्ह्ट, चर्चगेट, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह परिसर, त्याचबरोबर मांडवी, क्रॉफर्ड मार्पेट, धोबी तलाव, चिराबाजार आणि फणसवाडी हा मध्यमवर्गीय लोकवस्तीचा भागही येतो. हा मतदारसंघ संमिश्र आहे. मराठी, गुजराती, मारवाडी, पारसी, ख्रिश्चन आणि मुस्लीम मतदारांचा समावेश आहे.
नागरिकांमध्ये रोष
या भागात आंबेडकर नगर, गीता नगर, गरीब जनता नगर, धोबीघाट या झोपडपट्टय़ा आहेत. म2च्छिमार नगर येथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तेथील घरे अगदी लहान आहेत. आजपर्यंत या वसाहतींचा विचार झालेला नाही. यावरून विद्यमान आमदार राहुल नार्वेकर यांच्याविषयी मतदारांमध्ये रोष आहे. याचा फायदा महाविकास आघाडीचे हिरा देवासी यांना होऊ शकतो.
एकूण मतदार … 264768
पुरुष मतदार ….. 151073
महिला मतदार . 113686