महाराष्ट्रात सहा महिन्यांत दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पंतप्रधान मोदींचे दुर्लक्ष – खरगे

सत्तेत येण्यासाठी वाट्टेल त्या घोषणा देणाऱया भाजपला सत्ता मिळताच शेतकऱयांचा विसर पडतो. शेतकऱयांच्या सोयाबीन, कापूस, तुरीला किमान हमीभाव देऊ अशी घोषणा भाजपने केली होती. परंतु केंद्रात दहा वर्षे सत्तेत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱयांचा विसर पडला आहे. महाराष्ट्र राज्यात सहा महिन्यांत दोन हजार शेतकऱयांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत. शेतकऱयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल दुर्लक्ष करत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. ते लातूर येथील प्रचार सभेत बोलत होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खरगे यांनी भाजप आणि राज्यातील मिंधे सरकारवर सडकून टीका केली.

राज्यात बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी 50 खोके घेणाऱ्यांना घरी बसवण्याची वेळी आली आहे. विचारांना तिलांजली देणाऱया दलबदलूंना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मतदारांनी 20 तारखेला ही संधी गमावू नये. स्वतःसाठी 50 खोके घेणारे हे नेते सर्वसामान्य जनतेला संपवतील, असेही खरगे म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू, असे आश्वासन दिले होते. देशात प्रति वर्ष दोन कोटी रोजगार देऊ, असेही म्हटले होते. शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करू, महिलांना सुरक्षा देऊ, महिलांना मोफत गॅस देऊ, अशी भरमसाठ आश्वासने दिली होती, परंतु सत्तेत येऊन दहा वर्षे झाली आहेत तरीही मोदी यांनी ही आश्वासने पाळली नाहीत, असे खरगे म्हणाले.