राज्यातील भाजप-मिंधे सरकारला शेतकऱयांची चिंता नसून त्यांना फक्त स्वतःच्या खुर्चीची चिंता आहे. महायुतीचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे या विधानसभेत महायुतीविरोधात शेतकऱयांमध्ये तीव्र संताप आहे, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 175 जागा मिळणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच शेतकरी हिताचे निर्णय घेऊ, असे आश्वासन पटोले यांनी यावेळी दिले.
महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचारासाठी नाना पटोले यांची मुढीकोठा येथे जाहीर सभा झाली. राज्यात भाजपविरोधात जनतेत तीव्र संतापाची लाट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला 175 जागा मिळणार आहेत. रेती माफियांचा सुळसुळाट झाला असून याला भाजपचा पाठिंबा आहे. मविआचे सरकार आल्यानंतर वाळू मोफत देण्याचे धोरण आणले जाईल. तसेच वाळूमाफियांना आळा घातला जाईल, असे पटोले म्हणाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात येवून बटेंगे तो कटेंगे असे सांगत आहेत. तर उत्तर प्रदेशात पेपरफुटी झाल्याने लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. योगींना स्वतःचे राज्य सांभाळता येत नाही. परंतु, ते महाराष्ट्रात प्रचार करत फिरत आहेत, असा टोला पटोले यांनी योगींना लगावला.