पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर गुरुवारी संध्याकाळी महायुतीसाठी सभा पार पडली. या सभेला फार कमी गर्दी झाली होती. या सभेतील अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर मोदींनी घेतलेली सभा फ्लॉप झाल्याची चर्चा सध्या होत आहे. त्यातच मोदींच्या सभेचे व उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर घेतलेल्या सभांचे फोटोमधील तुलनाही सोशल मीडियावर शेअर केली जात आहे.
या सभेवरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. ”मुंबईचे आर्थिक महत्व कमी करण्याचा गुजरातच्या नेत्यांचा कुटील डाव ओळखल्याबद्दल मुंबईकरांचे धन्यवाद. राहिला भाग शिवाजीपार्क वर गर्दी जमवण्याचा, तर शिवाजीपार्क वर गर्दी फक्त ठाकरेंसाठीच जमते, आणि महाराष्ट्राच्या सुदैवाने तो एकमेव स्वाभिमानी ठाकरी बाणा महाविकास आघाडीकडे आहे”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.