
‘शिंदेंनी शिवसेना पक्ष फोडला, तसाच राष्ट्रवादी पक्षही फोडला. मात्र, महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता लोकसभेप्रमाणे आताच्या निवडणुकीतही करिश्मा दाखवेल,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ राजगुरूनगर येथील बाजार समितीच्या मैदानात आयोजित प्रचारसभेत शरद पवार बोलत होते.
‘विरोधी उमेदवाराला मी जेलमध्ये जाण्यापासून वाचवले. या तालुक्यात एकाधिकारशाही, गुंडगिरी, दहशतवाद करणाऱ्या व्यक्तीने गद्दारी केली. येथील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. तालुक्यातील जनता शिवसेनेचा उमेदवार बाबाजी काळे यांच्या ‘मशाल’ चिन्हासमोर बटण दाबून निवडून देईल,’ असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. ‘महाविकास आघाडी राज्यात एकदिलाने काम करत असून, राज्यात सत्ता येणार आहे. महाराष्ट्रात जे चाललंय ते स्वाभिमानी जनतेला पटलेलं नाही. या निवडणुकीत याचा प्रत्यय येईल,’ असे शरद पवार म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर,व्याख्याते प्रा. ताराचंद कराळे, जगन्नाथ बापू शेवाळे, प्रकाश म्हस्के, भगवान वैराट, नाना टाकळकर, मनीषा सुरेश गोरे, अशोक खांडेभराड, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, हिरामण सातकर, विजय डोळस, रामदास धनवटे, अमोल दौंडकर, विजयसिंह शिंदे, अमोल पवार, अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, संजय घनवट, सुरेश चव्हाण, लक्ष्मण जाधव, राजमाला बुट्टे-पाटील, विजया शिंदे, वंदना सातपुते, क्रांती सोमवंशी, मनीषा सांडभोर, पूनम पोतले, तनुजा घनवट आदी उपस्थित होते.
मोठे केले, पाच वेळा संधी दिली, तोच तुमची सभा होऊ नये म्हणून प्रयत्न करत होता. आजही तुमची भीती आहे. पूर्व भागाला अद्यापि पाणी मिळालेले नाही. भोरगिरी-भीमाशंकर रस्ता करता आला नसल्यामुळे, पश्चिम भागातील पर्यटनाला चालना न मिळाल्याने आदिवासी भागाच्या विकासाला खीळ बसली. चाकण, आळंदी, राजगुरूनगर या तीनही शहरांतील जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे. कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही. आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांना इंद्रायणीतील दूषित पाणी तीर्थ म्हणून आंघोळीसाठी योग्य नाही. तरीही विरोधक हजारो कोटींच्या कामाचा डंका पिटत आहेत. तालुक्यातील कोणताही रस्ता खड्डेमुक्त झाला नाही. पाणी योजना आल्या, मात्र नळाला पाणी येत नाही. ते दुसऱ्यांच्या विकासकामाचे श्रेय लाटत आहेत.’
सचिन अहिर म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांनी अनेक योजना आणल्या, तरी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभेला जनता विचार ऐकण्यासाठी गर्दी करत आहे. हा निष्ठावंतांचा मेळावा आहे. हातामध्ये मशाल घेऊन तुतारी वाजवणार आहे. समोरचा उमेदवार आज प्रचारातून ‘शरद पवारसाहेबांवर माझे प्रेम आहे,’ असे सांगत मंत्रिपदाचे स्वप्न पाहत आहे. मात्र, महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचे गाजर दाखवले तरी जनता भुलणार नाही. या मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकणार आहे.’