तीन वेळा आमदार तसेच दोन वेळा मंत्री असूनही भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीचा कोणताही विकास केला नाही. पार्किंगपासून ते रस्त्यावरील खड्यांपर्यंतच्या सर्व समस्या कायम आहेत. डोंबिवलीकरांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मात्र आज विकासाची स्वतंत्र ब्लू प्रिंटच मांडली. शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी हा वचननामा प्रसिद्ध केला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धारही त्यांनी केला. या ब्लू प्रिंटमध्ये बिझनेस सेंटर, सरकारी रुग्णालय, भव्य प्रशासकीय भवन, पार्किंग, रेल्वेच्या 350 एकर जागेचा पुनर्विकास करून त्यावर आयटी हब व बँकिंग क्षेत्र आदींचा समावेश आहे.
दीपेश म्हात्रे यांचा वचननामा
डोंबिवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपेश म्हात्रे व भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्यात मुख्य लढत होत आहे. आज महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासाची ब्लू प्रिंट प्रसिद्ध करण्यात आली. आतापर्यंत भाजप, मिंध्यांनी मतदारांना फसवले. पण शिवसेना महाविकास आघाडी डोंबिवलीचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी आघाडीचे उपजिल्हाप्रमुख तात्या माने, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर-राणे, मंगला सुळे, अभिजित सावंत, विलास म्हात्रे, राजेश शिंदे आदी उपस्थित होते.
कल्याण जिल्हा व डोंबिवली तालुक्याची निर्मिती
कल्याण व डोंबिवली या दोन्ही शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कल्याण हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करणार असून त्यात डोंबिवली तालुका समाविष्ट करण्यात येईल, असे ब्लू प्रिंटमध्ये म्हटले आहे.
ठळक वैशिष्ट्ये
■ पालिकेच्या सर्व प्रशासकीय सेवा एका छताखाली आणण्यासाठी रामभाऊ कापसे प्रशासकीय भवन उभारणार
■ वंदनीय बाळासाहेब बिझनेस सेंटरच्या माध्यमातून एक लाख रोजगाराची संधी. आयटी व विविध उद्योगांना संधी देण्यासाठी बिझनेस सेंटरची उभारणी
■ पॉवर हाऊस परिसरातील ३५० एकर रेल्वेच्या जागेचा विकास करून तेथे आयटी हब व बँकिंग क्षेत्र
■ डोंबिवलीकरांसाठी सुसज्ज सरकारी रुग्णालय व वाहनतळ
■ डोंबिवली रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे
■ हिंदू संस्कृती जोपासण्यासाठी स्वतंत्र वेदपाठ शाळा, वयोवृद्धांसाठी विशेष देखभाल केंद्र