कोणी दमदाटी, धमकी देत असेल, भीती दाखवत असेल तर घाबरू नका. मतदान आणि मतमोजणी झाली की हे सगळे गुंड भोसरी सोडून पळून जातील, अशी व्यवस्था आम्ही करून देतो, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप उमेदवाराचे नाव न घेता केली. वाटण्या करून, शहराची वाट लावणाऱ्यांना अद्दल घडवा. अजित गव्हाणे यांच्यासारख्या एका उमद्या नेतृत्वाला संधी द्या, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेतील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ चिखली घरकुल येथे सभा झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते. शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझम पानसरे, माजी आमदार विलास लांडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार यांची दूरदृष्टी आणि येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कामातून शहरातील समस्या सोडवण्यात आल्या; मात्र गेल्या दहा वर्षांत शहराची पुरती वाट लागली आहे. शहराच्या दोन भागात वाटण्या केल्या. गेल्या दहा वर्षांत ज्यांनी चोऱ्यामाऱ्या केल्या. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा नाही. त्यामुळे विकासासाठी गव्हाणे यांना संधी द्या, असे आवाहनही पाटील यांनी केले.
बेरोजगारी अन् भ्रष्टाचाराचा कळस
गुजरातचे मांडलिकत्व महाराष्ट्राने स्वीकारल्यासारखे काहीजण वागत आहेत. एकीकडे बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे, तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे. नांदेडकडे जाणारा जालन्याकडील एक नवा रस्ता केला. त्याचे 11 हजार कोटींचे टेंडर 15 हजार कोटीला दिले. विरारपासून एक नवा रस्ता केला, ज्याची कोणीही मागणी केलेली नव्हती. या रस्त्यासाठी 20 हजार कोटींचे टेंडर काढले खर्च मात्र 26 हजार कोटी होत आहे. सरकारी तिजोरीतून पैसे कसे काढायचे असतात हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू यांनाही तडे गेले. तिकडे संसदेची इमारत गळायला लागली. राम मंदिर बांधले, तर यांचा अयोध्येतच पराभव झाला. त्यामुळे आता भाजपमध्ये रामच राहिलेला नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त सत्तेचे आश्वासन देणाऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत भ्रष्ट कामगिरीचे रेकॉर्ड मोडले आहे. ज्या घरकुल परिसरात आजची सभा होत आहे. त्या नागरिकांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन आपल्याच घरात राहण्याची वेळ या सत्ताधाऱ्यांनी आणली. मतदानाला जाताना याचा विचार करून ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबा आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी पुढे या.
अजित गव्हाणे, उमेदवार, महाविकास आघाडी, भोसरी विधानसभा मतदारसंघ
View this post on Instagram