पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही, शरद पवारांचा फडणवीसांवर हल्ला

पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करणाऱया देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

फडणवीस मध्यंतरी एके ठिकाणी म्हणाले की, मी फार मोठं काम केलं, मी दोन पक्ष फोडले. पक्ष उभा करायला अक्कल लागते, कष्ट लागतात, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. या लोकांनी पक्ष फोडले. आज निवडणुकीत लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर या लोकांना चिंता वाटू लागली. त्यामुळे नवनवे कार्यक्रम जाहीर केले, असे शरद पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेक जण मंत्री होते. मात्र शिंदेंनी काही लोक घेतले आणि गुवाहाटीला जाऊन बसले. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडणे आणि सत्ता हाती घेणे हा लोकशाहीचा मार्ग आहे का? आज अनेक ठिकाणी लोक पक्ष फोडणे हे काही मला मान्य नसल्याचे सांगतात, असे पवार म्हणाले.

पवार साहेबांची शेवटची निवडणूक म्हणणारे दुश्मन

शरद पवारांची ही शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य करणाऱया अजित पवार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांना समाचार घेतला. साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे असं कुठला दुश्मन म्हणतोय, असा सवाल त्यांनी केला. असं कुणीच कुणाबद्दल बोलत नाही. ते आमचे संस्कारही नाहीत. एखाद्याशी मतभेद असले तरी प्रत्येकाचं आयुष्य दीर्ष आणि आनंदी असावं, असं आम्हाला वाटतं, असे सुप्रिया म्हणाल्या.