गद्दारांना सुट्टी नाही, शिक्षा झालीच पाहिजे; शरद पवार यांचा वळसे-पाटलांवर घणाघात

ज्यांनी आमची साथ सोडली, त्या गद्दारांना शिक्षा झालीच पाहिजे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांबरोबर ज्या गणोजी शिर्पेने गद्दारी केली, त्या गणोजीला महाराष्ट्र अजून विसरलेला नाही. जो गद्दारी करतो, त्याला शिक्षा द्यायची असते, या ‘गणोजी’ला आता सुट्टी नाही, असा घणाघात करून तुम्हाला माझा एकच शब्द आहे, वळसे-पाटील यांना शंभर टक्के पराभूत करा, असे जबरदस्त आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील जाहीर सभेत केले.

शरद पवार यांच्या पुणे जिह्यात आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जुन्नर तालुक्यात ओतूर येथे सत्यशील शेरकर, मंचरमध्ये देवदत्त निकम, राजगुरूनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे आणि भोसरीमध्ये अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी झंझावाती सभा झाल्या.

शरद पवार म्हणाले, ‘‘ज्यांना अनेक ठिकाणी संधी दिली, शक्ती दिली, अधिकार दिले, त्यांनी शब्द न पाळता आमची साथ सोडली. ज्यांनी तुम्हाला सोडले, त्यांनी बोलण्यासारखे काही ठेवलेले नाही. एकच ठेवले, ते म्हणजे गद्दारी केली. जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते. या गणोजींना आता सुट्टी नाही. या मतदारसंघातील निवडणुकीत माझा एकच शब्द आहे, वळसे-पाटलांना शंभर टक्के पराभूत करा,’’ असे सांगताच सभेत एकच जल्लोष झाला.