महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेंपासून सेफ राहू! आदित्य ठाकरे यांचे मतदारांना आवाहन 

मिंधे सरकारच्या काळात महाराष्ट्राला काहीही मिळालेले नाही तसे कार्यकर्ते, सर्वसामान्यांना काही मिळालेले नाही. गद्दारांनाच सर्व मिळाले आहे. मंत्रीपदे, महामंडळाची पदे, न्यासाची अध्यक्ष पदे मिळाली आहेत. आता भाजपवाले सांगत आहेत की, बटेंगे तो कटेंगे. बरोबर सांगत आहेत. कारण आपण विखुरले गेलो तर आपला खिसा हे लोक कापणार आहेत. म्हणून आपण महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेपासून सेफ राहू. त्यासाठी मशालीला मतदान करत महाराष्ट्रातील अंधार दूर करा, असे आवाहनही शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.  या वेळी त्यांनी मिंधे आणि भाजपवर हल्लाबोल केला. मुंबई वाचवण्यासाठी महाराष्ट्रद्वेष्टय़ा सरकारला गाडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वांद्रे पूर्वचे शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई, कलिना विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय पोतनीस आणि कुर्ला विधानसभेच्या उमेदवार प्रवीणा मोरजकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या आज दणदणीत सभा झाल्या.

भर चौकात फाशी द्या!

कर्नाटकातील रेवण्णासारखा राक्षस आणि गुजरातमधील बिल्कीस बानोच्या बलात्काऱयांना स्वतःच्या पक्षात घेतले. त्यांचा सत्कार केला. ते हिंदुत्ववादी कसे असू शकतात. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवण दिली आहे की, महिलेची कोणताही जातपात धर्म असो, तिच्यावर कोणी हात उचलला तर त्याचा जात, धर्म न पाहता त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे, हे आपले हिंदुत्व असले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

काळे कायदे लागू करू देणार नाही 

उद्योगपतींबरोबर कामगारांचा विश्वास उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. म्हणून काळे कामगार कायदे आम्ही महाराष्ट्रात लागू करू देणार नाही. असे अनेक प्रश्न आहेत. सरकारी कर्मचारी, बेस्ट कर्मचारी त्यांचे पेन्शन, ग्रॅच्युइटी असेल, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचाऱयांना मुंबईत घरे द्यायची आहेत, पण जिथे जिथे मुंबईकरांना मागे खेचले जात आहे ते रोखायला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

अदानीला फुकटात जमीन

मुख्यमंत्री प्रत्येक सभेत विचारतात, आले पैसे आले, काय करणार, असे त्यांनी किती पैसे दिलेत बहिणींना.  अदानीसारखा राक्षस मुंबई गिळायला बसला आहे. मिंधे, भाजप आपल्या अंगावर येत मुंबई लुटायला बसले आहेत. या मतदारसंघातही मदर डेरीचा 21 एकरचा प्लॉट आहे, तो अदानीला फुकटात दिला आहे. मुंबईत पिढय़ानपिढय़ा राहणाऱयांना कोणालाही अदानीसारखी जमीन फुकट मिळत नाही. मुंबईकरांना एक इंचही जमीन मिळत नाही आणि अदानीला फुकटात जमीन का देण्यात येत आहे, असा सवालही त्यांनी केला.

धारावीकरांना धारावीतच घरे देऊ 

धारावीचा विकास आम्हाला हवा आहे. पण हा विकास करताना धारावीकरांना घराबाहेर काढले जाणार आहे. कुणाला कुर्ल्याला आणले जाणार आहे, कुणाला मढ तर कुणाला मिठागरांवर पाठवले जाणार आहे. पण ज्या मिनिटाला आमचे सरकार बनेल त्याच मिनिटाला आम्ही धारावीचा प्रकल्प रद्द करून धारावीकरांच्या हक्काची 500 फुटांची घरे धारावीकरांना धारावीतच देऊ, हा माझा तुम्हाला शब्द आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच निवृत्त पोलिसांना मुंबईतच हक्काची घरे देऊ, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.